केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक राजधानी नवी दिल्ली येथे होऊन त्यामध्ये आगामी पश्चिम बंगाल विधानसभेसाठी तयार राहण्याचा संदेश देण्यात आला. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर आता आपल्याला पश्चिम बंगाल विधानसभेवर ताबा मिळवायचा आहे, त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीमध्ये केले. तरी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालमधील आव्हान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी मोठे कठीण आणि खडतर असणार आहे यात शंका नाही. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता राबवणार्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामध्ये भाजपाला वरचढ होऊ द्यायचे नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे. अर्थात, गेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालावर नजर टाकली तर या राज्यामध्ये भाजपने केवळ शिरकाव केला आहे असे नाही, तर बर्यापैकी मुसंडीही मारल्याचे दिसून येते. दहा वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त तीन आमदार निवडून आणू शकलेला भारतीय जनता पक्षाने 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र 70 आमदारांपर्यंत मजल मारली होती. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहता या राज्यामध्ये भाजपाला तृणमूल काँग्रेसबरोबर जोरदार संघर्ष करावा लागला होता आणि 42 जागांपैकी फक्त 12 जागाच भारतीय जनता पक्षाला मिळवता आल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक, गेल्या वर्षी झालेली लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहिले तर प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्येच असणार आहे. खरे तर ज्या राज्यामध्ये एकेकाळी दीर्घकाळ कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती आणि काहीकाळ काँग्रेसचीही सत्ता होती त्या राज्यामध्ये विधानसभेमध्ये सध्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांचा एकही सदस्य नाही हे फार मोठे दुर्दैव मानावे लागेल. ममता बॅनर्जी ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला आपला स्पर्धक मानतात त्याच प्रकारे त्या काँग्रेस पक्षाला आणि कम्युनिस्ट पक्षांनासुद्धा प्रमुख स्पर्धक मानतात. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये ममता बॅनर्जी या इतर पक्षांसोबत मैत्री करत असल्या तरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांची मैत्री नको असते. त्याचमुळे राज्यात दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या कम्युनिस्ट पक्षांना आणि काँग्रेस पक्षाला सध्या निवडणुकीत यश मिळताना दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचा विचार करता या राज्यामध्ये त्यांचे मित्र पक्ष नाहीत. साहजिकच ज्या प्रकारे त्यांनी बिहारमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मित्र पक्षांच्या साथीने सत्ता मिळवली तशा प्रकारची कोणतीही सोय पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षासाठी उपलब्ध नाही. जो काही संघर्ष त्यांना करायचा आहे तो स्वबळावरच करायचा आहे आणि ममता बॅनर्जी यांची ताकद जास्त असल्यामुळे भाजपालाही आपली सर्वाधिक ताकद लावून या निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे.आगामी नववर्षाच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होणार असल्याने आणखी काही कालावधी बाकी असला तरी या निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे संकेत मात्र भारतीय जनता पक्षाने दिले आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे इतर पक्षांमधील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षांमध्ये घेऊन या राज्यातील भाजपचा बेस वाढवण्याचा प्रयत्न केला आहेच. त्याशिवाय केंद्रातील विविध योजनांचा वापर करून आणि आकर्षक घोषणा करूनही भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. पण मुळात बंगालची भूमी ही धार्मिक आधारावर राजकारण करणार्या पक्षांना साथ न देणारीच आहे. म्हणूनच या राज्यामध्ये दीर्घकाळ कम्युनिस्ट पक्षांची सत्ता होती. तरीही गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 70 जागांपर्यंत मुसंडी मारली ही बाब विसरून चालत नाही. याची जाणीव स्वतः ममता बॅनर्जी यांनाही असल्याने त्यांनीसुद्धा आगामी निवडणूक गांभीर्यानेच घेतली आहे. गेल्या काही कालावधीमध्ये पश्चिम बंगाल सरकारकडून घेतले जाणारे निर्णय आणि ममता बॅनर्जी यांनी फक्त आपल्या राज्यावर केंद्रित केलेले लक्ष पाहता भारतीय जनता पक्षाचे ‘ऑपरेशन बंगाल’ कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होऊ द्यायचे नाही हेच त्यांनी ठरवले आहे, असे दिसते.