आपल्या जाचक आणि विचित्र टॅरिफ पॉलिसीच्या निमित्ताने जगातील छोट्या मोठ्या देशांना सतत धक्का देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशातील न्यूयॉर्क महानगरीतील मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदी ट्रम्प यांनी जोरदार विरोध केलेले झोहरान ममदानी यांचा मोठा विजय झाल्यामुळे ट्रम्प यांचा राजनैतिक पराभव झाला आहेच, शिवाय त्यांना आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षालाही जोरदार धक्का बसला आहे. खरे तर कोणत्याही मोठ्या देशातील एखाद्या मोठ्या शहराचा महापौर होणे किंवा त्या पदाची निवडणूक होणे ही राष्ट्रीय राजकारणात फारशी महत्त्वाची गोष्ट नसते. पण अमेरिकेत महानगरांचे महापौर हेसुद्धा मोठे सत्ताकेंद्र असल्याने त्यातही न्यूयॉर्कसारख्या सर्वात मोठ्या शहराचा महापौर होणे ही अभिमानाची बाब असल्याने महापौरपदाची निवडणूक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीमध्ये ममदानी यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली होती, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे स्लीवा हे उमेदवार होते. निवडणुकीमध्ये तिसरे उमेदवार न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर कुओमो हे होते. या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या उमेदवाराचा पराभव तर झालाच शिवाय त्यांना तिसर्या स्थानावर जावे लागले. कारण या निवडणुकीमध्ये दुसर्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला मिळाली. या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक उमेदवार ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्कला विकासासाठी निधी मिळणार नाही अशा प्रकारची धमकी देण्यापर्यंतही ट्रम्प यांची मजल गेली होती. अर्थात, या धमकीला न्यूयॉर्कमधील मतदारांनी भीक घातली नाही आणि त्यांनी मोठ्या मताधिक्याने ममदानी यांना महापौर पदावर बसवले. फक्त 34 वर्षांचे असलेले ममदानी यांनी ही निवडणूक जिंकून अनेक विक्रम तर नोंदवलेच शिवाय न्यूयॉर्कचे प्रथम मुस्लीम महापौर होण्याचा मानही मिळवला. त्यांची आई मीरा नायर या प्रख्यात भारतीय निर्माता दिग्दर्शक आहेत. महापौरपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ममदानी यांनी थेटपणे ट्रम्प यांना आव्हान दिलेच शिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका गाजलेल्या विधानाचाही उल्लेख केला. सुडाचे राजकारण करण्यामध्ये प्रख्यात असलेले डोनाल्ड ट्रम्प आगामी कालावधीमध्ये याबाबत कोणती पावले उचलतात हे पाहणे जरी महत्त्वाचे असले तरी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये कशाप्रकारे पराभूत करता येऊ शकेल याचा दाखला मात्र मतदारांनी निश्चितच घालून दिला आहे. ज्या प्रकारे ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन या मंत्रांचा जप करत अमेरिकेची मूलभूत व्यवस्थाच विस्कळीत केली आहे, त्यावरून अमेरिकेत सार्वत्रिक पातळीवर नाराजी आहे. ट्रम्प यांनी जारी केलेले टॅरिफ धोरण असो किंवा इमिग्रेशनचे नियम असोत याबाबत सर्वसामान्य नागरिक ही समाधानी नाहीत. ममदानी यांची भूमिका याबाबत अत्यंत स्पष्ट आहे. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक द्वेषाचे किंवा वांशिक भेदाचे राजकारण करण्यास त्यांचा विरोध आहे आणि त्यांनी अनेक वेळा आपली ही पॉलिसी जाहीर केली होती. म्हणूनच ट्रम यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण ज्या प्रकारे ममदानी यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारचा प्रचार करून घरोघरी जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली त्याचा चांगलाच परिणाम मतदारांवर झाला. न्यूयॉर्कमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचून ममदानी यांनी आपले मत आणि भूमिका व्यक्त केली होती. ममदानी यांचे तरुण वय त्यांच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा, त्यांची पटणारी मते याचा एकत्रित परिणाम होऊनच न्यूयॉर्कमधील मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या महापौरपदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकेतील न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया या स्टेटच्या गव्हर्नरपदाची निवडणूकही होणार होती. या निवडणुकीमध्येही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. वर्षापूर्वी दुसर्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानावा लागेल. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या अट्टहासापायी आपण जे काही करत आहोत ते अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला आवडत नाही याची जाणीव आता ट्रम्प यांना व्हायला हरकत नाही. अर्थात, ट्रम्प यांची एकूणच मानसिकता आणि इतर राजकारण पाहता अशा प्रकारच्या काही एखाद्या पराभवामुळे त्यांच्या धोरणामध्ये कोणता मोठा बदल होईल अशी आशा करणे चुकीचे ठरेल. आपण करतोय तेच बरोबर आहे यावर ठाम विश्वास असणारे ट्रम्प यापुढेही पूर्वीच्या चुकीच्या पद्धतीने वागत राहणार आहेत यात शंका नाही. पण स्वतःला अपराजित आणि सर्व शक्तिमान मानणार्या ट्रम्प यांना पराभवाची चव चाखायला लावण्याची शक्ती अमेरिकेतील मतदारांच्या हातात आणि मनात आहे हे सिद्ध झाले आहे. अमेरिकेतील राजनैतिक तज्ज्ञांच्या मते, आगामी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना किंवा त्यांच्या पॉलिसीचे समर्थन करणार्या नेत्यांना पराभूत कसे करायचे याचा दाखला न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी दिला आहे.