राजधानी नवी दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सर्वच पातळीवर सक्षमपणे करण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास संस्था, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, आयबी या सर्व प्रमुख तपास संस्थांनी सखोल तपास करून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी या स्फोटाच्या निमित्ताने दहशतवादाचे जे नवीन रूप समोर आले आहे त्याचाही विचार करावा लागेल. राजधानी दिल्लीमध्ये हा स्फोट झाला म्हणून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. पण गेल्या आठवड्यात गुजरातमध्येसुद्धा अशाच प्रकारे एका दहशतवादी कटाला अयशस्वी करण्यात आले. गुजरातमधील या कटामागे रासायनिक हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना होती; पण नवी दिल्ली येथे जो स्फोट झाला त्याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. सर्वसाधारणपणे दहशतवाद्यांनी आतापर्यंत जे बॉम्बस्फोट घडवले आहेत त्यामध्ये आरडीएक्स किंवा इतर तत्सम सुधारित स्फोटके वापरण्यात आली आहेत; पण राजधानीमध्ये स्फोटात अशा प्रकारे कोणती स्फोटके वापरून स्फोट करण्यात आला याबाबत निश्चित निष्कर्ष अद्याप समोर आला नाही. कारण कदाचित हा स्फोटही रासायनिक पद्धतीने घडवण्यात आला असावा अशी एक शंका आहे. गुजरातमध्ये ज्या प्रकारे रासायनिक हल्ल्याचा कट उधळण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवरच राजधानी नवी दिल्लीतील स्फोटाकडे बघावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातमधील जो कट अयशस्वी झाला तेव्हासुद्धा एका सुशिक्षित डॉक्टरलाच अटक करण्यात आली होती. नवी दिल्लीतील स्फोटामागेसुद्धा चार डॉक्टरांचाच हात असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही कालावधीमध्ये एटीएस किंवा इतर तपास संस्थानी देशाच्या कानाकोपर्यात ज्या ज्या ठिकाणी कारवाया करून दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे, त्यापैकी अनेक जण उच्च शिक्षित असल्याचेही लक्षात आले आहे. त्यामध्ये डॉक्टर इंजिनिअरचा जास्त समावेश आहे. नवी दिल्लीतील स्फोटामध्ये महिला दहशतवाद्यांचा सहभाग हा एक नवीन विषयही समोर आणला आहे. या स्फोटामागे एक महिला डॉक्टरचाही हात असल्याचे तपास संस्थांच्या लक्षात आले आहे. जैश-ए-मोहम्मद सारखी संघटना भारतामध्ये महिलांची विंग उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याचेच प्रयत्न म्हणून हा स्फोट घडवण्यात आला असावा हेही नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा भारतात किंवा इतरत्र कोठेही एखादा दहशतवादी हल्ला केला जातो तेव्हा तातडीने एखादी दहशतवादी संघटना त्या हल्ल्याची जबाबदारी घेते. नवी दिल्लीतील स्फोटानंतर कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याचा अर्थ भारतीय भूमीवरच कार्यरत असलेल्या पण कोणत्याही एका विशिष्ट संघटनेशी संबंधित नसलेल्या काही समविचारी समाजघातक तरुणांनी मिळून हा कट रचला असावा, असेही दिसते. गुजरातमधील रासायनिक हल्ला रोखण्यात जरी एटीएसला यश आले असले तरी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके पकडल्यावरही नवी दिल्लीतील स्फोट मात्र टाळणे एजन्सीजना शक्य झाले नाही. सर्व प्रमुख तपास संस्था सखोलपणे तपास करत असल्याने या कटाच्या मुळाशी निश्चितच जाऊन जबाबदार लोकांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण यानिमित्ताने दहशतवादाचे जे नवीन रूप समोर येताना दिसत आहे त्याची दखलही तपास संस्था आणि एटीएससारख्या प्रतिबंधक संस्थांना घ्यावी लागणार आहे. शिक्षित आणि उच्चविद्याविभूषित तरुणाई दहशतवादाकडे का वळत आहे याचा शोधही घ्यावा लागणार आहे. नव्वदच्या दशकामध्ये जेव्हा मुंबईत किंवा इतरत्र स्फोट झाले होते तेव्हा परकीय दहशतवादी संघटनांना मदत करणारे जे स्थानिक नागरिक होते ते बहुतांशी गरीब घरातील आणि अशिक्षित होते. पैशाच्या आमिषाने त्यांनी दहशतवादी संघटनांना मदत केली होती. पण जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आणि चांगल्या प्रकारच्या नोकरीवर असलेले तरुण दहशतवादाकडे वळतात तेव्हा त्याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी भारतातील अनेक तरुणांनी भारत सोडून इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी मानसिकता तयार केली होती. त्या कालावधीमध्ये अशा अनेक तरुणांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा भारतात आणण्यात आले होते आणि त्या योजनेला चांगले यशही मिळाले होते. त्याच धर्तीवर आता दहशतवादाचे हे नवीन रूप समोर आल्याने समुपदेशनाच्या माध्यमातून किंवा या समस्येच्या मुळापर्यंत जाऊनच ही उच्चविद्याविभूषित तरुणाई देशाविरुद्ध दहशतवादी कट करण्याच्या मानसिकतेत का गेली आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्धामध्ये व दहशतवादी कारवायांमध्ये रासायनिक तंत्रज्ञान नेहमीच अधिक घातक ठरते. गुजरातमधील फसलेला कट किंवा दिल्लीतील स्फोट यामध्ये रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर भविष्यात अशा प्रकारचे रासायनिक स्फोट होऊ नयेत यासाठी ही संस्थांना काळजी घ्यावी लागणार आहे. चोर किंवा दहशतवादी नेहमीच पोलिसांच्या किंवा तपास संस्थांच्या एक पाऊल पुढे असतात अशी जरी म्हण प्रचलित असली तरी दिल्लीस्फोटानंतर ही म्हण खोटी करायची जबाबदारी तपास संस्थांनी स्वीकारायला हवी.