अग्रलेख : पावसाळी संकटे
जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या प्रारंभी राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आणि त्याच्या जोडीने पावसामुळे निर्माण होणारी संकटेही समोर आली. या संकटांना पावसाला किंवा निसर्गला अजिबात जबाबदार धरता येणार नाही.

Rain : जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या प्रारंभी राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आणि त्याच्या जोडीने पावसामुळे निर्माण होणारी संकटेही समोर आली. या संकटांना पावसाला किंवा निसर्गला अजिबात जबाबदार धरता येणार नाही. तर या संकटांची चाहूल न लागल्यामुळे जी प्रशासकीय अव्यवस्था समोर आली, त्यामुळेच राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी या समस्या समोर येताना दिसत आहेत.
‘नेमेची येतो पावसाळा’ असे असले तरी या पावसाच्या (Rain) जोडीने दैनंदिन जीवन विस्कळीत करणार्या अनेक गोष्टीही येत असल्याने त्याची पूर्वतयारी जर झाली नसेल तर काय होऊ शकते याचे उदाहरण पहायला मिळाले. एकतर जून महिन्याचा बहुतांश कालावधी पावसाविना गेल्याने प्रशासन गाफील राहिले आणि अचानक जेव्हा पावसाला सुरुवात झाली तेव्हा सर्वांचीच धावपळ झाली.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरण्याचा विषय काही नवीन नाही. गेले अनेक वर्षे हा विषय चर्चेला जात आहे. पण त्यावर कोणालाही तोडगा काढता येत नाही. या कालावधीमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. तरीही समस्या कायमच राहिली आहे. पावसाचे पाणी ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात पडत आहे, त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात पाणी साचणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.
पण याची कोणतीही तयारी कधीच प्रशासन करत नसल्यामुळे राजधानी मुंबापुरीची नेहमीच तुंबापुरी होताना दिसते. यावेळी तर मुंबईमध्ये संकटांची मालिकाच समोर आली. एक झाड स्कूल बसवर पडल्याने निष्पाप (Rain) विद्यार्थ्यांचा बळी गेला. मॅन हॉलमध्ये पडल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि काही ठिकाणी घरे कोसळण्याच्याही घटना घडल्या. सखल भागात पाणी साठल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेच शिवाय मालमत्तेचे नुकसानही झाले.
पावसाळी हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई महापालिकेचे सत्ताधारी असो किंवा राज्य सरकारचे सत्ताधारी असोत, मुंबईतील सर्व पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा करत असतात. अनेक ठिकाणी भेटी दिल्याचे पुरावेही छायाचित्रांच्या माध्यमातून सादर केले जातात. पण अशी पावसाळी कामे पूर्ण झाली असती तर पावसाला सुरुवात झाल्यावर ही संकटांची मालिका का सुरू होते याचे उत्तर आता सत्ताधार्यांना द्यावे लागणार आहे. यापूर्वी अनेक वेळा मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
अतिवृष्टीचे अनेक प्रसंग या महाराष्ट्राने झेलले आहेत. त्यापासून कोणताही धडा घेण्यात न आल्याने दरवर्षीच अशा प्रकारच्या संकटांच्या मालिकांना सामोरे जावे लागत आहे. आणखी काही दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन आता राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. पण रोजीरोटीचा प्रश्न असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पाऊस असो किंवा नसो बाहेर पडावेच लागणार आहे. साहजिकच बाहेरील परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांना अनुकूल असेल हे पाहणे राज्य सरकारची जबाबदारी असते.
दैनंदिन व्यवहार व्यवस्थित सुरू राहतानाच कोणतेही संकट कोसळणार नाही, याची काळजी सरकारलाच घ्यावी लागणार. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी उघडी चेंबर्स आहेत, मॅन हॉलला झाकणे नाहीत, गटारे उघडी आहेत अशा ठिकाणी पाणी भरले की काहीच कळत नाही आणि त्यातूनच प्राणहानी होऊ शकते. अर्थात, केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील ज्या महानगरांमध्ये सिमेंटच्या रस्त्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था व्यापली आहे, त्या ठिकाणी पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने सखल भागात पाणी साचून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे ही एक नित्याचीच बाब झाली आहे.
नागरिकांनी घराच्या बाहेर न पडणे हा त्यावरील उपाय असू शकत नाही. प्रशासकीय यंत्रणेवर सत्ताधार्यांचा वचक असेल तर ही यंत्रणा व्यवस्थित हलते आणि कार्यक्षमपणे काम करते, असे आजपर्यंत सिद्ध झाले आहे. मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर शहरे असोत, ज्या ठिकाणी अशी पावसाळी संकटे समोर आली आहेत त्या ठिकाणी सत्ताधारी प्रशासनाला दोष देत आहेत आणि प्रशासन याबाबत काहीच बोलत नाही अशी परिस्थिती आहे. या दोघांनी समन्वयाने काम केले तरच पावसाळी संकटांशी यशस्वीपणे मुकाबला करणे शक्य आहे.
पावसाळी हंगामातच नवीन शैक्षणिक वर्षालाही सुरुवात झालेली असते. साहजिकच विद्यार्थ्यांची वर्दळ रस्त्यांवरून वाढलेली असते. अशा विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर व्हावा याची काळजी प्रशासनाला घ्यावीच लागेल. अतिवृष्टीच्या काळात शाळांना सुट्टी देणे हा एक पर्याय असला तरी तो हा पर्याय नेहमीच निवडणे योग्य ठरत नाही.
मुळात आता कोठे पावसाला सुरुवात झाली आहे आणि या सुरुवातीच्या काळातच अशा प्रकारे अव्यवस्था समोर येत असेल तर, पावसाळी हंगाम जेव्हा शिखरावर असेल तेव्हा काय परिस्थिती असेल त्याची कल्पनाच करायला नको. येत्या काही दिवसांत पाऊस जेव्हा उघडीप देईल तेव्हा प्रशासनाने डोळे उघडे ठेवून सर्व कामे केली तर आगामी पावसाळी हंगामसुद्धा संकट विरहित आणि सुखकर होऊ शकेल.
दुष्काळाची चाहूल लागली असतानाच आता निसर्गाने पावसाची चांगली देणगी देण्याचे ठरवले आहे. हा पावसाळी हंगाम संकटांची मालिका ठरू नये, याची काळजी सरकारला घ्यावीच लागेल.






