राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, सगळी स्थिती स्पष्ट झाल्यानंतर निकालात भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसले. त्याचबरोबर राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीचे घटक पक्ष म्हणून शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे जे दोन पक्ष आहेत त्यांनाही चांगले यश मिळालेले दिसले. या तीनही पक्षांच्या विजयाचे गणित एकत्रितपणे पाहिले तर दोन तृतीयांश पेक्षा अधिक यश महायुतीला मिळाले आहे असा सहज निष्कर्ष कोणीही काढू शकतो. पण ठिकठिकाणच्या या विजयामागचे नेमके कारण लक्षात घेतले तर हे भाजपाचे वैयक्तिक यश नाही हे सहज लक्षात येते तसेच या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले त्यामुळे या तीनही पक्षांची एकत्रित गोळाबेरीज करून महायुतीच्या यशाचे गणित मांडणे संयुक्त ठरत नाही. त्यातही भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावावर जर आपण नजर टाकली तर यातले जवळपास ऐंशी टक्के उमेदवार पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचेच असल्याचे लक्षात येते. या निवडून आलेल्या भाजपच्या एकूण सदस्यांपैकी एका अंदाजानुसार जेमतेम वीस ते पंचवीस टक्के उमेदवारच मूळ भाजपचे आहेत. आज सोशल मीडियावर भाजपच्या काही नाराज लोकांकडून ज्या पोस्ट आल्या आहेत त्यात भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांपैकी तब्बल 90 टक्के लोक बाहेरच्या पक्षांचे आहेत असे नमूद करण्यात आले आहे. भाजपाचा मूळ कार्यकर्ता आजही केवळ सतरंज्या उचलण्याचेच काम करीत आहे आणि सत्तेचा मलिदा बाहेरून आलेले लोक चाखत आहेत अशी नाराजीही या पोस्टमध्ये व्यक्त केलेली दिसली. भाजपाने बाहेरची माणसे घेऊन स्वतःचा पक्ष वाढवला आणि आपल्या पक्षाचे प्रभुत्व प्रस्थापित केले हे लोकांना स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर उपर्या लोकांनीच वर्चस्व गाजवले हा आरोप अगदीच बिनबुडाचा नाही. अर्थात, राजकारणात जो जीता वही सिकंदर असे म्हणण्याची प्रथा आहे, त्यामुळे भाजपच्या यशामागचे इंगित काहीही असले तरी दृश्य स्वरूपात भाजपने राज्यात आपला प्रभाव निर्माण केला आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. भाजपामध्ये होणारी इनकमिंग आता बंद करा या मागणीसाठी चक्क भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे आपल्याला यापूर्वी पाहायला मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यात घाऊक पद्धतीने राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अन्य नेते भाजपमध्ये घेतले गेल्याने तेथे भाजप मुख्यालयात निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले होते, पण त्याचा पक्षश्रेष्ठींवर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी फक्त निवडणुका जिंकण्याचे तंत्र लक्षात ठेवून बाहेरच्या लोकांचे प्रवेश चालूच ठेवले. त्यात मोहोळ जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या नगरपरिषदेत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखत राजन पाटलांनी ती नगरपरिषद जिंकली. त्यांचा विजय हा भाजपचा विजय म्हणून गणला जाऊ लागला, असेच सगळीकडे झाले आहे. आपल्याकडे सासवड नगरपालिकेसह असंख्य ठिकाणी असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. सासवड नगरपालिकेतील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी तेथे आपल्या व्यक्तिगत प्रभावाने यश मिळवले. ते यशही भाजपच्या नावावर जमा झाले. अशी एकामागून एक अनेक उदाहरणांची जंत्री आपल्याला पाहायला मिळते. आपण जरी अशी यादी तपासत बसलो तरी भाजपला आज मिळालेल्या यशाला कोणतेही गालबोट लावता येणार नाही. राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठीच केले जाते, त्यासाठी साम-दाम-दंड भेदाचा वापर केला जातो आणि तेच भाजप करत आली आहे. महापालिकेच्या निवडणुका आता दोन-तीन आठवड्यांवर आल्या आहेत त्या निवडणुकांवर भाजपने काल मिळवलेल्या यशाचा प्रभाव निश्चित उमटणार आहेच, पण महापालिका निवडणुकांसाठीही भाजपाने विरोधी पक्षांचे ठिकठिकाणचे शक्तिशाली नेते आणि उमेदवार फोडून अशीच जय्यत तयारी केली आहे. अनेक शहरांमधूनही भाजपच्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी या इनकमिंगला विरोध दर्शवला पण येथेही या विरोधाचा काही उपयोग झाला नाही. भाजप श्रेष्ठींनी सरसकट इनकमिंग करून मोठी वातावरण निर्मिती केली आहे. अशा प्रकारातून भाजप पक्ष यंत्रणेत जी नाराजी निर्माण होते ती नाराजी पुण्यातही पाहायला मिळाली. मध्य पुणे, वारजे, खडकवासला अशा ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी प्रचारासाठी आणलेले साहित्य फेकून देऊन आपली संपर्क कार्यालय गुंडाळली असल्याचा प्रकारही घडला आहे. इनकमिंगला दिलेल्या अनुमतीमुळे निष्ठावान भाजप कार्यकर्ता जो नाराजी व्यक्त करतो त्याला पक्षात किंचितही किंमत दिली जात नसल्याचाही अनुभव आहे. भाजपाच्या नेत्यांना आता केवळ निवडणुकीतील यशाचीच नशा चढली असून त्यासाठी त्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही, त्यावर आज कोणाकडेही उपाय नाही. निवडणुका जिंकण्यासाठीचे आपले तंत्रच यशस्वी ठरते हे नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकीतील यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपचे नेते हेच तंत्र अवलंबणार आणि पुन्हा हाच यशस्वी प्रयोग करून दाखवणार हे निश्चित आहे. या सगळ्या गोष्टींचा आता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांनीच विचार करायचा आहे.