Editorial : राजकीय पक्षांमध्ये असलेले वादविवाद किंवा मतभेद आता सगळीकडेच हाणामारीच्या पातळीवर परावर्तित होत आहेत, हे वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक असून त्याला वेळीच पायबंद घातला नाही, तर सगळाच सामाजिक तोल बिघडू शकतो. कायदा सुव्यवस्थेचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हाणामारीच्या पातळीवर आलेली ही राजकीय शत्रुता सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या संदर्भात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक असे प्रसंग घडलेले आहेत. त्या प्रत्येक घटनांची आपण येथे चर्चा करणार नाही, तर केवळ पुणे शहरात अलीकडच्या काळात ज्या घटना घडल्या त्या अनुषंगानेच आपण येथे परामर्श घेणार आहोत. पुणे शहराचा सांस्कृतिक लौकिक येथे नव्याने प्रतिपादित करण्याची गरज नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्यात विविध विचारसरणीच्या राजकीय संघटनांची आणि कार्यकर्त्यांची संख्या कायमच मोठी राहिली आहे. या सर्व राजकीय पक्षांनी आतापर्यंत आपापले राजकीय विचार जोपासताना आपले मुद्दे जनतेपुढे मांडले किंवा विरोधी विचारसरणीच्या लोकांनाही ते ऐकवले; पण त्यातून कधी गुद्दागुद्दी झाल्याचे पहायला मिळत नव्हते. ‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे’ हे जे वाक्य सातत्याने पूर्वी ऐकवले जायचे ते वाक्य पुण्यातले वेगवेगळ्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते शब्दशः पाळत असत. पण राजकारणातला हा समतोल आणि सहिष्णुता आता जवळपास लयाला गेल्यासारखी परिस्थिती दिसते आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना राजकीय द्वेषातून मारहाण करण्याचा प्रकार घडला, एवढेच नव्हे तर त्यांना पिस्तूल दाखवून धमकावण्यात आले. आमच्या पक्षाच्या विरोधात का बोलतो, हा त्यांच्यावर हल्ला करणार्या भाजप समर्थक कार्यकर्त्यांचा त्यांना प्रश्न होता. एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात दुसर्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने काही मतप्रदर्शन करणे याला खरं म्हणजे विरोध असण्याचे कारण नाही. हे मतप्रदर्शन संसदीय भाषेच्या चौकटीत असले पाहिजे ही प्राथमिक अट पाळली जाणे आवश्यक आहे. हनुमंत पवार यांनी चॅनलवरील चर्चेत संसदीय भाषेत भाजप समर्थकांचा प्रतिवाद केल्यानंतर त्यांना थेट पिस्तूलचा धाक दाखवून जीवघेणी मारहाण होईल आणि हा प्रकार मध्य पुण्यात घडेल याची कल्पनाही कोणी केली नसावी. याच पुण्यात काही दिवसांपूर्वी राजकीय द्वेषातून काँग्रेस भवनसमोर काँग्रेस व भाजपचे समर्थक भिडलेले पाहायला मिळाले. यावेळी दगडफेकही झाली. या दगडफेकीत काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पत्रकारही जखमी झाले होते. हा प्रकारसुद्धा अवाक् करणारा ठरला होता. काँग्रेस भवनवर हल्ला करणार्या भाजप कार्यकर्त्यांच्या जमावामध्ये पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांचाही सहभाग होता, त्यांच्या समक्ष हा गंभीर प्रकार घडल्याने या प्रकाराचे गांभीर्य खूपच वाढते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे एक विधान रुचले नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी हे कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनांवर चालून गेले. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर चालून जात तेथे दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रकार पुणे शहरात यापूर्वी क्वचितच घडला आहे. पुणे हे साहित्य संमेलने आणि साहित्यविषयक परिसंवादाचे शहर आहे, तसेच ते सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे शहर आहे, या शहरात विविध राजकीय पक्षांमध्ये एकोपा दर्शवणारे अनेक कार्यक्रम वर्षभर सातत्याने होत असतात. विविध राजकीय पक्षांच्या वर्धापन दिनाला सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते हजेरी लावत असतात. इतके सगळे सलोख्याचे आणि सुसंस्कृतपणाचे वातावरण पुणे शहरात असताना या वातावरणाला दूषित करणारी ही प्रवृत्ती इतकी शिरजोर कशी झाली याचा सगळ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. राजकारणातील मतभेद असहिष्णुतेच्या पातळीवर जाणे आणि त्यातून शहराच्या लौकिकाला गालबोट लागणे हे कोणत्याच अर्थाने उचित नाही, ही बाब सर्वच राजकीय पक्षाच्या धुरिणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. पुणे शहरातल्या विविध कट्ट्यांवर आजही वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे कार्यकर्ते खेळीमेळीने वावरत असतात. सॅटर्डे क्लब सारख्या उपक्रमांमध्येही विविध राजकीय पक्षाचे नेते एकमेकांशी व्यक्तिगत मैत्रीसंबंध जपत असतात. या सगळ्यांनीच आता केवळ औपचारिकता म्हणून एकत्र येण्याऐवजी पुणे शहरात राजकीय वातावरण बिघडवण्याची ही जी प्रवृत्ती जोर धरू लागली आहे त्याला कसा पायबंद घालायचा यावर विचार केला पाहिजे. पुण्यात अलीकडेच घडलेल्या या काही आक्षेपार्ह घटना अशा सहज दुर्लक्षित करून चालणार नाही. पुणे शहराचा लौकिक कायम जपणे ही सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची जबाबदारी आहे. झाल्या प्रकाराबद्दल संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खुलेपणाने झालेली चूक कबूल करून वातावरण निवळण्यासाठी हातभार लावला पाहिजे. असे झाले तर त्यांची प्रतिमाही सुधारणार आहे, पुणेकरांनाही तेच अपेक्षित आहे.