Editorial : मार्च अखेरपर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. सरकारने दिलेला शब्द जवळपास पूर्ण झाला आहे. जवळपास म्हणण्याचे कारण असे की, नक्षलवाद पूर्ण संपला आहे हे सांगायला किंवा मोजायला कोणती (Editorial) फूटपट्टी नाही किंवा ते कोणते अंकशास्त्रही नाही. नक्षलवाद्यांची एक विचारधारा होती, त्याचा प्रभाव आता ओसरला आहे असे मानायला जागा असल्यामुळेच सरकारचा शब्द पूर्ण झाल्याचे म्हणता येऊ शकते. सत्तेचा मार्ग हा बंदुकीच्या गोळीतून जातो किंवा हिंसाचारातूनच जातो असे मानणारा हा वर्ग होता. त्यांना हिंसाचाराचे कोणतेही कृत्य वर्ज्य नव्हते. देशातील बहुतांश भागात त्यांनी रेड कॉरिडॉर अर्थात आपला प्रभाव स्थापित केला होता. बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश ते अगदी कर्नाटकपर्यंत नक्षलवादाचा प्रभाव स्थापित होता. एक वेळ अशी आली होती की देशातील 100 जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांनी आपले समांतर सरकार स्थापित केले होते. त्यांनी जो हिंसाचार सुरू केला तो हादरवणारा होता. केंद्र सरकार आणि नक्षलवाद प्रभावित राज्यांची सरकारे नक्षलवाद्यांसमोर हतबल झाल्याचे दिसत होते. Editorial भरदिवसा रस्ते आणि रेल्वेमार्ग स्फोटकांनी उडवून देणे, गाड्यांचे स्फोट घडवून आणणे, खबरी असल्याच्या संशयावरून गावकर्यांना ठार करणे अशा घटना व्हायच्या. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ताफ्यावर करण्यात आलेला नक्षली हल्ला अंगावर शहारे आणणारा होता. पंचवीसपेक्षा जास्त नेते त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. असाच हिंसाचार त्यांनी छत्तीसगडच्याच बस्तर जिल्ह्यातही घडवून आणला होता. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. थोडेथोडके नाही तर तब्बल 72 जवान तेव्हा हुतात्मा झाले होते. देशातील एकतृतीयांश जिल्ह्यांत नक्षलवाद्यांची दहशत होती. हे सगळे आता इतिहासजमा झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. 31 मार्च 2026 हा दिवस भारताच्या इतिहासात आणि नक्षलवाद्यांच्या इतिहासातही कायमचा स्मरणात ठेवला जाईल. त्याचे कारण या दिवसाने हिंसाचार मुक्तीची एक नवीन पहाट देशाला अनुभवायला दिली. हे सगळे घडले ते केवळ सरकारच्या इच्छाशक्तीमुळे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्याचे श्रेय दिलेच पाहिजे. वास्तविक नक्षलवाद समाप्तीच्या घोषणा राजकीय पक्षांकडून कायमच केल्या गेल्या. केंद्रीय स्तरावर आणि राज्यांच्या निवडणुकांतही प्रमुख राजकीय पक्षांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील लोकांना असेच आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. गेली जवळपास तीन दशके नक्षलवाद्यांचे थैमान सुरू होते. त्याचा बीमोड व्हायला मात्र 2026 साल उजाडावे लागले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीनेही 2014 मध्येच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नक्षलमुक्तीचा नारा दिला होता. त्याला प्रत्यक्षात सुरुवात झाली ती अमित शहा देशाचे गृहमंत्री झाल्यापासूनच. शहा यांनी जवळपास प्रत्येक चर्चेत नक्षलवादाचा नायनाट करण्याचा आपला निर्धार बोलून दाखवला होता व तो अखेर पूर्णही केला. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जेव्हा दृढ इच्छाशक्ती दाखवते तेव्हा काय होऊ शकते याचेही हे उदाहरण ठरावे. शंभरपेक्षा जास्त जिल्ह्यांत ज्यांची सरकारला समांतर यंत्रणा होती त्या नक्षलवाद्यांना गेल्या दोन अडीच वर्षांत अक्षरश: गुडघे टेकायला लावण्यास सुरक्षा यंत्रणांनी भाग पाडले. एकट्या 2024-25 या वर्षात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकोणिसेपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक केली गेली तर 600 पेक्षा जास्त जणांना कंठस्नान घालण्यात आले. तब्बल 3 हजारच्या जवळपास नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत शरणागती पत्करली. नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू, गणेश उइर्क आणि पतिराम मांझी या त्यांच्या म्होरक्यांचा खात्मा करण्यात आल्याने त्यांच्या कथित चळवळीचे कंबरडे मोडले गेले. नक्षलवादी दिशाहीन झाले. कधीकाळी आपली स्वत:ची यंत्रणा स्थापन करण्याची स्वप्ने पाहणारे हे नक्षलवादी या कारवाईमुळे सैरभैर झाले आणि या गोंधळात त्यांच्याकडे आकृष्ट होणार्या नव्या वाट चुकलेल्या तरुण-तरुणींचा ओघही कमी झाला. बंदुकीवरच विश्वास असणार्या नक्षलवादाला केवळ बंदुकीनेच उत्तर दिलेले बरे असे म्हणायला आणि ऐकायलाही बरे वाटत असले तरी ते पूर्ण सत्य नाही. त्याचे कारण जेव्हा एखादी गोष्ट नष्ट होते किंवा केली जाते तेव्हा त्याला पर्याय काय आहे व तो कसा चांगला आहे तेही त्या चळवळीच्या पाठीराख्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना अथवा त्यांच्यामुळे पोळले गेलेल्यांना दिसायला हवे. केवळ धडक कारवाई न करता केंद्रातील सरकारांनी आणि राज्यांच्या सरकारांनी तेच केले. नक्षलप्रभावित भागांत म्हणजे जिल्ह्यांत जवळपास 10 हजार किमीपेक्षा जास्त रस्ते बांधले गेले, तेवढ्याच संख्येने मोबाइल टॉवर उभारले गेले. आर्थिक व्यवहार सुखकर व्हावेत यासाठी जोखीम पत्करत बँकांच्या शाखाही स्थापन केल्या गेल्या. प्रगतीचा हा मार्ग निश्चितच त्यांना सुखावह आणि आश्वासक वाटला असणार व त्याचा कुठेतरी हिंसाचाराची पाळेमुळे नष्ट करण्यात उपयोग झाला. विकास हा केवळ शांतता असेल तरच होऊ शकतो. तसेच शांतता असेल तरच जगण्याचा आनंद उपभोगता येतो. नक्षलवादाची जी कथित विचारसरणी लोकांच्या गळी उतरवण्यात आली होती त्यातील फोलपणा उघड झाल्यावर हळूहळू लोक मुख्य प्रवाहाकडे परतताना दिसले. अर्थात कोणताही विचार मानणारे लोक पूर्णत: संपत नसतात. त्यांची संख्या कमी होत असते व वेळप्रसंगी ते पुन्हा डोकेही वर काढू शकण्याचा धोका असतो. त्या दृष्टीने भविष्यात सावध राहावेच लागणार आहे.