Editorial : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या इस्त्रायलच्या दौऱ्यामुळे भारत आणि इस्त्रायल या दोन महत्त्वाच्या देशांमधील मैत्रीला एक वेगळे परिमाण मिळणार आहे हे निश्चित. आपल्या अकरा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा इस्त्रायल दौऱ्यावर गेलेले नरेंद्र मोदी यांचे इरादे स्पष्ट दिसत आहेत. भारताचा इतिहास पाहता इस्त्रायल हा भारताचा कधीच नैसर्गिक मित्र नव्हता. पण गेल्या दहा-बारा वर्षांच्या कालावधीमध्ये गणिते बदलून गेली आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक या देशाशी मैत्री वाढवली आहे. 1947 नंतरच्या कालावधीमध्ये इस्त्रायलची निर्मिती झाल्यावर त्याला मान्यता देण्यास तत्कालीन भारत सरकारचा विरोध होता. एवढेच नाही तर 1992 पर्यंत भारत आणि इस्त्रायल यांच्यामध्ये कोणतेही सकारात्मक मैत्रीचे संबंध नव्हते .आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये इस्त्रायल हा भारताचा महत्त्वाचा मित्र ठरला आहे. एकीकडे गाझापट्टीमध्ये इस्त्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहेच. पॅलेस्टीनचा काही प्रदेश बळकवल्याबद्दल गेल्याच आठवड्यात 100 पेक्षा जास्त देशांनी निषेधाचे पत्र काढले होते यावर भारताचीही सही होती. याच पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण इस्त्रायलच्या विरोधात अनेक इस्लामिक देश एकत्र येण्याचे प्रमाण वाढले आहे .त्याला तोंड देण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी एक वेगळा इस्लामविरोधी गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेगळ्या गटामध्ये भारत, रशिया आणि आणखी काही देश असणार आहेत. त्यासाठी सुद्धा नेतान्याहू यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उभय देशांमध्ये व्यापारी संबंध सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्या प्रमाणात विकसित झाले आहेत. भारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची खरेदी करत आहे. या व्यतिरिक्त दहशतवाद विरोधी धोरण राबवताना सुरक्षा यंत्रणांचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये सातत्याने देवाणघेवाणही सुरू असते. इस्त्रायलमध्ये निर्यात करणारा भारत हा आशियामधील चीन नंतरचा दुसरा देशही ठरला आहे. पॅलेस्टिन विषयावरून आणि गाझा पट्टीतील संघर्षावरून जगभरातील अनेक देशांनी इस्त्रायलचा निषेध केला असला तरी त्याचा कोणताही फरक इस्त्रायलवर पडलेला नाही. इस्लामिक राष्ट्रांच्या दडपशाहीसमोर झुकायचे नाही हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांना जर नरेंद्र मोदी यांच्यासारखा मित्र मिळाला तर तो त्यांना हवाच आहे. म्हणूनच इस्त्रायलच्या संसदेमध्ये भाषण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्या परराष्ट्र व्यवहार धोरणांमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. यापूर्वीच्या सरकारने ज्यांची मैत्री जपली होती किंवा ज्या देशांकडे दुर्लक्ष केले होते त्याचा विचार करून अगदी वेगळ्या मार्गाने परराष्ट्र व्यवहार नीती राबवण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र खात्याकडून सुरू आहे आणि इस्त्रायलची मैत्री हा त्याचाच एक भाग आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत आताच भारतात पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर टीकाही केली आहे व काही सवालही केले आहेत. पाकिस्तानसह जगभरातील सर्वच इस्लामिक देश इस्रायलला आपला कट्टर शत्रू मानतात .बहुतांशी युरोपियन देश जरी इस्रायलच्या बाजूने असले तरी आशियामधील अनेक मुस्लिम राष्ट्रे सुद्धा इस्रायलचा सतत विरोध करत असतात. या पार्श्वभूमीवर आशियामधील एक महत्त्वाचा देश आपल्या बाजूने असणे हे इस्त्रायलसाठी निश्चितच महत्त्वाचे होते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला इस्त्रायलने सर्वाधिक महत्त्व दिले आहे. या दौऱ्यातून भारतासाठी सुद्धा काहीतरी पदरात पडेल असे निश्चितच दिसत आहे. संरक्षण वस्तूंच्या उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या इस्त्रायलची मदत भारताला निश्चितच होणार आहे .याव्यतिरिक्त इस्लामिक दहशतवादाशी लढण्यासाठी एक स्ट्रॅटेजीक पार्टनर म्हणून सुद्धा इस्त्रायल महत्त्वाचा ठरणार आहे. जरी यापूर्वीच्या अनेक सरकारांनी पॅलेस्टीनची बाजू घेऊन इस्त्रायलचा विरोध केला असला तरी, आधुनिक काळात अशा प्रकारची भूमिका घेणे शक्य होणार नाही, हाच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने दिला आहे. भूराजकीय गणिते झपाट्याने बदलत असताना आणि आपला स्वार्थ हाच एकमेव अजेंडा महाशक्तींसह सर्वच राष्ट्रांकडून राबवला जात असताना भारताला पारंपरिक बाबींनाच कवटाळून बसणे परवडणारे नाही. भारत आणि इस्त्रायल यांच्यामधील ही वाढती मैत्री पाकिस्तानसह अनेक इस्लामिक राष्ट्रांना डोळ्यात खुपणारी असली तरी ते काहीच करू शकत नाही. पण आगामी कालावधीमध्ये इस्लामिक देश सुद्धा गाझापट्टीतील संघर्षाच्या निमित्ताने इस्त्रायलविरोधात एखादी आघाडी उभारण्याचे संकेत यानिमित्ताने मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यानंतर आता नजीकच्या काळामध्ये नेतान्याहूसुद्धा भारतीय दौऱ्यावर येतील आणि भारत इस्त्रायल मैत्रीचे हे पर्व असेच सुरू राहील असे संकेत आता निश्चित मिळत आहेत.