Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशाला संबोधित करताना काटकसरीचे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असली तरी आता गेल्या काही दिवसांमध्ये देशातील महागाईचा आलेख ज्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे ते पाहता नाईलाजाने का होईना; पण देशातील नागरिकांना काटकसरीचे धोरण अवलंबवावेच लागणार आहे. कारण ज्या प्रमाणात सध्या महागाई वाढत आहे त्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे (Narendra Modi) उत्पन्न वाढत नाही. त्या उत्पन्नातच वाढीव खर्च बसवण्याचे दिव्य आव्हान सर्वसामान्य नागरिकांना पेलावे लागणार असल्याने काटकसर करण्याशिवाय कोणासमोरच पर्याय राहणार नाही. जगातील विद्यमान युद्ध परिस्थितीमुळे सर्वच अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असली तरी गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कदाचित विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकारने (Narendra Modi) सर्वसामान्य नागरिकांना फारशी महागाईची झळ बसू दिली नव्हती. पण विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर स्वयंपाकाच्या गॅसची किंमतही वाढली आणि पेट्रोल-डीझेलचे दरही वाढवण्यात आले. त्याचा एकत्रित परिणाम आपोआपच पुरवठा साखळीवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दररोज लागणार्या अनेक वस्तूंची महागाईची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे टंचाई असतानाच दुसरीकडे महागाईची पातळीसुद्धा वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. Narendra Modi टंचाई आणि महागाई या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कारण जेव्हा पुरवठासाखळी विस्कळीत होते तेव्हा त्याचा लाभ करून घेण्यासाठी साठेबाज आणि काळाबाजारवाले मोठ्या प्रमाणात कृत्रिम टंचाई निर्माण करतात. अशा प्रकारच्या कृत्रिम टंचाईमुळे आपोआपच महागाई वाढते. सध्या महागाईचा दर वाढता वाढता वाढत असून टंचाईसुद्धा त्याच पद्धतीने वाढत आहे. ही टंचाई काही प्रमाणात नैसर्गिक असली तरी त्याला कृत्रिम टंचाईची एक नियोजनबद्ध झालरही आहे. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपले उखळ पांढरे करून घेण्याची सवय असणारे घाऊक व्यापारी आणि साठेबाज व नफेखोर सामान्य नागरिकांच्या हिताचा विचार न करता आपला फायदा बघूनच व्यवहार करत असल्याने टंचाई आणि महागाई या दोन्ही गोष्टींची झळ एकाच वेळी सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. देशातील बहुतांशी सर्वसामान्य नागरिकांचे पर्यायी अन्न असलेला वडापाव किंवा तत्सम पदार्थसुद्धा आता दुप्पट किमतीला विकले जात आहेत. चहाचा कप असो किंवा उसाच्या रसाचा ग्लास असो, या सर्वसाधारण वस्तूसुद्धा आज नेहमीपेक्षा कितीतरी जास्त दराने नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवास महाग झाला आहे, मग बससारखा सार्वजनिक प्रवास असो किंवा रिक्षा प्रवास, टॅक्सी प्रवास असो सर्वत्र जादा दराने पैसे मोजावे लागत आहेत. जरी सर्वसामान्य नागरिकाने आपले स्वतःचे वाहन वापरले तरी पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त खर्च इंधनावर करावा लागत आहे. देशातील बहुतेक घरांमधील एक अविभाज्य भाग असलेल्या दुधाचे दरही गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच उत्पादक कंपन्यांनी वाढवले आहेत. साहजिकच आगामी कालावधीमध्ये इतर दुग्धजन्य पदार्थसुद्धा महाग होणार आहेत. इंधनदरात वाढ झाल्यामुळे पुरवठासाखळीसुद्धा महाग झाली आहे. त्याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतीवरही होणार आहे. या महागाईचा एकत्रित परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन होण्याच्या पलीकडील असणार आहे. जाणीवपूर्वक आणि नियोजन पद्धतीने काटकसर करायचे ठरवले तरी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजा भागवताना काटकसर करता येत नाही हा विषयही या निमित्ताने लक्षात घ्यायला हवा. ज्यांचे हातावरचे पोट आहे म्हणजेच रोज व्यवसाय करून ज्यांना आपल्या पोटासाठी कमाई करायची आहे, अशा लोकांचे जीवनाचे गणित फारच बिघडून जाणार आहे. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे महागाई वाढली की त्याचा विक्रीवरही नकारात्मक परिणाम होतो. विक्री कमी झाली तर नफा कमी होतो. त्याचा फटका जसा मोठे घाऊक व्यापारी, छोटे किरकोळ व्यापारी यांना बसतो तसाच, अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय करणार्या व्यावसायिकानाही बसतो. साहजिकच पंतप्रधानांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले असले तरी देशातील महागाईमुळे नागरिकांचे जे हाल होणार आहेत, त्याकडेसुद्धा मोदी सरकारने लक्ष द्यायला हवे. ज्या महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे तेथे सर्व ते उपाययोजना करून महागाई आवाक्यात आणायला हवी. अमेरिका, इराण यांच्यातील लष्करी संघर्ष अजून किती दिवस चालेल याचा कोणताच अंदाज नसल्याने महागाई आणि टंचाईचा हा वाढता आलेख भारतातील सर्वसामान्य नागरिकांना भलताच त्रासदायक ठरणार आहे हे लक्षात घेऊन सरकारने योग्य धोरण राबवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन काही प्रमाणात सुसह्य करण्याचा प्रयत्न करावा.