अग्रलेख : धनखड यांचा ठावठिकाणा

देशात सध्या सगळीकडेच काही ना काही आक्रित घडताना दिसत आहे. निवडणुकीतील मतदानाचे नवनवीन घोळ रोजच उघड केले जात असून फटाक्यांची माळ लागावी तशी प्रकरणे समोर येत आहेत. हे सगळे एकीकडे घडत असतानाच दुसरीकडे आणखीनच एक गंभीर मुद्दा विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांचा ठावठिकाणाच लागेनासा झाला आहे. ते अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्याआधी राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केली आहे.
सिब्बल यांनी तर जगदीप धनखड यांच्या ठावठिकाण्याविषयी शंका व्यक्त करणारे जाहीर निवेदन केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जगदीप धनखड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहे; पण त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकलेला नाही. एकदा मी केलेला फोन उचलला गेला; पण तो फोन धनखड यांच्याऐवजी त्यांच्या सुरक्षारक्षकाने उचलला आणि त्याने, ‘साब आराम कर रहे है’ असे उत्तर देऊन फोन ठेवून दिला. नंतर पुन्हा त्याच फोनवर संपर्क साधला असता फोनच उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेविषयी शंका निर्माण झाली आहे.
अशीच शंका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे बोलून दाखवली. धनखड आहेत का त्यांना गायब केले गेले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेली शंका गंभीरच आहे. जो माणूस देशाच्या दुसर्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर अगदी परवापरवापर्यंत कार्यरत होता त्याच्या ठावठिकाण्याविषयी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित करणे किंवा आशंका व्यक्त करणे हे निश्चितच गंभीर आहे. धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला, हे गूढ अजून उकललेले नाही. त्यांच्या राजीनाम्याविषयी विविध वाहिन्यांनी आणि राजकीय तज्ज्ञांनी वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देत आपले आकलन मांडले; पण त्यातून नेमक्या वस्तुस्थितीचा उलगडा होऊ शकलेला नाही.
धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात प्रकृतीच्या कारणाचा दाखला दिला आहे, पण ज्या दिवशी त्यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली त्या दिवशी ते दिवसभर विविध बैठकांमध्ये व्यस्त होते त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचे कारण तितकेसे खरे नाही हे एव्हाना सगळ्यांनाच समजून चुकले आहे. आपल्या राजीनाम्याविषयी खुद्द धनखड पत्रकारांशी बोलतील किंवा निदान सोशल मीडियावरून तरी व्यक्त होतील अशा प्रतीक्षेत अनेक जण होते, पण गेल्या अनेक दिवसांत ना ते सोशल मीडियावर व्यक्त झाले, ना त्यांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मग धनखड हे अचानक असे मौनात का गेले यावरून शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. ज्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला त्या दिवशी त्यांचे घर आणि कार्यालय सील केले गेले असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या होत्या.
ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून कोणी केली त्याचाही उलगडा झाला नाही, त्यानंतर धनखड यांचा राजीनामा हा विषय बाजूला टाकला गेला आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरूनही तो विषय गायब झाला. सरकार किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांकडून धनखड यांच्या राजीनाम्याला अजिबातच महत्त्व दिले गेले नाही ही बाब एक वेळ समजून घेता येईल, पण धनखड यांचे सार्वजनिक दर्शनच बंद होणे किंवा त्यांचा ठावठिकाणाच लागेनासा होणे हे विचित्रच लक्षण मानले पाहिजे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या निधनाच्या आधी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो नंतर सोशल मीडियावर प्रसारित झाला. त्यात ते आपल्याला सरकारकडून खोटेपणाने गुंतवले जात असल्याच्या तक्रारी करताना दिसत आहेत. पण निदान सत्यपाल मलिक यांचा रुग्णालयातला व्हिडिओ तरी बाहेर आला.
मात्र, जगदीप धनखड यांचे एकही निवेदन किंवा दर्शन अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. मुळात ते दिल्लीत आहेत किंवा कसे, ते त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानीच आहेत, की त्यांना अन्यत्र शिफ्ट केले गेले आहे याचीही कोणतीच माहिती जाहीर झालेली नाही. त्याविषयी देशवासीयांना आणि देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. धनखड यांच्या खुशालीविषयी जाहीरपणे शंका व्यक्त केली गेली असताना आता त्यांची ख्यालीखुशाली सरकारकडूनच जाहीर होणे अपेक्षित आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने त्याविषयीचे निवेदन जाहीर करून लोकांच्या मनातील शंका दूर करावी किंवा खुद्द धनखड यांनी निदान सोशल मीडियामार्फत तरी प्रकट होऊन आपल्याबाबतची माहिती द्यावी अशी अपेक्षा कोणीही व्यक्त करील. उपराष्ट्रपती पदावरचा माणूस अचानक असा सार्वजनिक जीवनातून गायब होणे हे संपूर्ण देशासाठी आणि देशातील सध्याच्या एकूणच व्यवस्थेविषयी शंका निर्माण करणारे आहे, ही शंका दूर करण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे गरजेचे आहे.





