सुरक्षा संस्थांच्या एका चुकीमुळे मोठे नुकसान आणि जीवितहानी होत असते. जेव्हा सुरक्षेतील त्रुटीमुळे एखादी दुर्घटना होते तेव्हा सुरक्षा संस्थांना टीकेला सामोरे जावे लागते. त्यांनी अगोदर केले असलेले आणि सतत करत असलेले त्यांचे चांगले काम झाकोळले जाते. त्यांनी शत्रूच्या अनेक नापाक मनसुब्यांना उधळून लावलेले असते, तेही दुर्लक्षित होते आणि त्यांना प्रखर टीकेचा सामना करावा लागतो. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट ही अशीच घटना आहे. सुरक्षा संस्थांचे उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या चर्चा आणि मागण्या होत आहेत. ते रास्तही आहे, तथापि दिल्लीत जे काही घडले तो एका बदलत्या आणि देशविरोधी शक्तींना पोषक वातावरण उपलब्ध करून देणार्या वातावरणाचा एक भाग आहे आणि भविष्यात आपल्याला सातत्याने सावधच राहावे लागेल याची जाणीव करून देणारा आहे. दिल्लीत ज्या दिवशी स्फोट झाला त्याच्या काही तास अगोदरच सुरक्षा संस्थांनी फरीदाबाद येथे डॉक्टरांचा भरणा असलेले दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर अचानक राजधानीत स्फोट झाला. दहशतवादी बिथरल्यामुळे त्यांनी हे अचानक कृत्य केले किंवा भीतीतून त्यांच्याकडून हे घडले असे मानले जाते. त्यात तथ्यही आहे, मात्र त्याचवेळी त्यांनी ज्या भागात स्फोट घडवून आणला आणि त्याची जी वेळ निश्चित केली तीही विचारपूर्वक केली होती हेही दुर्लक्षित करता येत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर करण्यात आलेले हे स्फोट होते आणि त्याकरता दिल्लीचीच निवड केली गेली. जेथे स्फोट झाले तो लाल किल्ल्याचा परिसर होता. येथूनच स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करत असतात. त्यात देशाच्या प्रगतीची आणि सुरक्षेची ग्वाही दिली जाते. त्याच ठिकाणी अपघातानेही असेल कदाचित दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. हजारो किलोची स्फोटके जप्त करण्यात सुरक्षा संस्थांना यश आले होते. त्याकरता ते प्रशंसेस पात्र आहेतच. कारण जर ती जप्ती झाली नसती तर 26 जानेवारी अथवा त्याच्याही अगोदर सुनियोजितपणे अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात आणि असंख्य लोकांची हत्या करण्यात दहशतवाद्यांना यश आले असते. स्फोटकांची ती गाडी घेऊन डॉक्टर असलेला आत्मघाती हल्लेखोर बराच वेळ राजधानीत फिरत होता तरीही कोणत्याही तपास यंत्रणेच्या जाळ्यात तो अडकला नाही ही आपल्या सुरक्षा यंत्रणेतील गंभीर त्रुटीही समोर आली व तीही देशाच्या राजधानीत. सरकारला आणि सर्वच यंत्रणांना त्याचा विचार करावा लागेल. दिल्ली स्फोटाच्या संदर्भात यावेळी एक वेगळा प्रकार घडला तो असा की सामान्यत: कोणतेही दहशतवादी अमानुष कृत्य घडवून आणल्यानंतर तातडीने कोणतीतरी दहशतवादी संघटना त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारते. त्यांच्या दृष्टीने हा अभिमानाचा विषय असतो. ते ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्यामुळे असेल किंवा पाकिस्तानने आपला खेळ बदलला असेल म्हणून अशी कोणतीही संघटना पुढे आली नाही. सुरुवातीच्या तपासात जे धागेदोरे आढळले त्यांचे तार अगोदर तुर्कीएकडे आणि नंतर बांगलादेशकडेही जाणारे निघाले. पाकिस्तानशी तुर्कीएची होत असलेली चुंबाचुंबी आणि बांगलादेशचे सध्याचे भारताच्या विरोधातले चेकाळलेपण पाहता जे तार दिसत होते ते विश्वासार्ह होते. अर्थात, दहशतवादी हल्ल्याचे हे धागेदोर कुठेही जात असले तरी त्याचे उगमस्थान कुठले आहे ते भारताला आणि येथील तपास संस्थांना समजायला वेळ लागत नाही आणि मुळात ते अत्यंत क्लिष्ट आणि अवघड कधीच नसते कारण पाकिस्तान कुठेतरी त्यांच्या लायकीनुसार त्यातून डोकावतोच आणि उघडा पडतो. संबंधित आत्मघाती हल्लेखोराच्या समोर आलेल्या व्हिडिओ क्लिपने नंतर पाकिस्तानचे कनेक्शन उघडच केले. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आणखी काही वेगळे खेळ करण्याचा प्रयत्न यावेळी केला. मोठी घटना घडल्यावर भारताकडून सिंदूर कारवाई पुन्हा सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी त्याच दिवशी इस्लामाबादेत न्यायालयाच्या परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटावरून भारताच्या नावाने बोंबाबोब सुरू केली. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच भारतावर आरोप केले. बलुचिस्तानात सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांशी त्यांनी भारताचा संबंध जोडण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात कसोशीने चालवला आहे. त्यांनी हा नवा प्रयोग करून पाहिला असला तरी तो मुळातच फसला कारण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. भारतीयांना प्रश्न असा पडला आहे की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे मोठे तळ बेचिराख केल्यानंतरही पाकिस्तान इतका सक्रिय कसा झाला आहे? त्याचे उत्तर अमेरिकेशी नव्याने वाढलेल्या जवळीकीत आहे. इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्या देशाचे धाडस वाढले आहे. ट्रम्प यांच्या दुसर्या काळात तेच घडते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख व कथित फिल्ड मार्शल मुनीर यांची वॉशिंग्टनसमोर सुरू असलेली हुजरेगीरी ट्रम्प यांचा इगो सुखावणारीच आहे. ओबामांच्या राजवटीत व नंतरही बायडेन यांच्या चार वर्षांच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला एका मर्यादेत ठेवले होते. ते बंधन ट्रम्प यांनी शिथिल केले. त्यामुळेच पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. त्याला भारताकडून पाकिस्तानला अनपेक्षित असा प्रतिसाद दिला गेला तरी शरीफ आणि मुनीर यांच्या वॉशिंग्टन वार्यांमुळे आणि तुंबलेली आर्थिक मदत पुन्हा सुरू झाल्यामुळे पाकिस्तान दिल्ली व अन्यत्र मोठे स्फोट घडवण्याचे कट रचण्याचे धाडस करू शकला. हा नवा खेळ आहे. सुरक्षा यंत्रणांनाच नाही, संपूर्ण देशाला अत्यंत सावध राहावे लागेल.