Samrat Choudhary : देशातील बहुचर्चित अशा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रिपदी भाजपाचे नेते सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांनी शपथ घेतल्याने देशातील आणखी एका राज्याचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळाले आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये तब्बल दहा वेळा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या प्रादेशिक राजकारणाचा त्याग करून केंद्रीय पातळीवरील राजकारणात उडी घेण्याचा निर्णय घेतल्याने बिहारमध्ये (Samrat Choudhary) हा सत्तापालट झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बिहार विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला होता. तरीही झालेल्या कराराप्रमाणे त्यांनी नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, केवळ 7 महिन्यांतच मुख्यमंत्रिपद सोडल्यामुळे शंकाकुशंका निर्माण झाल्या. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेले सम्राट चौधरी आता मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारच्या एकूण राजकारणावर मोठा परिणाम करणारा हा निर्णय ठरणार आहे. कारण, बिहारचे राजकारण नेहमीच जातीपातीच्या संख्याबळावर आधारित असते. बिहारमधील प्रमुख समाज असलेला यादव विरुद्ध इतर ओबीसी समाज यांच्यामध्ये नेहमीच सत्तासंघर्ष सुरू असतो. नितीश कुमार स्वतः कुर्मी या ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तर नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे कोईरी या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा यादव समाजाचा प्रभाव वाढत होता तेव्हा नितीश कुमार यांनी लवकुश योजना आखून कुर्मी समाज आणि कोईरी समाज यांना एकत्र आणले होते. यादव समाजाच्या व्यतिरिक्त जो ओबीसी समाज आहे त्याला एकत्र करून लालूप्रसाद यांना तोंड देण्याची एक रणनीती नितीश कुमार यांनी आखली होती आणि त्यास नेहमीच यश मिळाले होते. Samrat Choudhary म्हणूनच गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 10 वेळा मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम नितीश कुमार यांना करता आला. बिहारचे नवे सम्राट असलेले मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे एकेकाळी नितीश कुमार यांचे कट्टर राजकीय वैरी होते. नितीश कुमार यांना सत्तेवरून घालवेपर्यंत मी माझा फेटा काढणार नाही अशी गर्जना सम्राट चौधरी यांनी केली होती. पण जेव्हा नितीश कुमार एनडीएमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी ती शपथ मागे घेतली होती. आता सम्राट चौधरी यांचे मुख्यमंत्रिपदाचे नावसुद्धा नितीश कुमार यांनी सुचवले होते. मुळात राष्ट्रीय जनता दल, समता पार्टी अशा पक्षांमधून प्रवास करून नंतर भाजपामध्ये सामील झालेले सम्राट चौधरी (Samrat Choudhary) हे ओबीसी चेहरा असलेले नेते आहेत. बिहारचे गृह खाते सांभाळणारे सम्राट चौधरी हे केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याही विश्वासातील आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करूनच बिहारची सूत्रे सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहेत. ज्या प्रकारे एकूण राजकीय रचना नितीश कुमार यांनी केली आहे ती पाहता बिहारच्या राजकारणावर त्यांचे लक्ष आणि नियंत्रण दोन्हीही राहणार आहे. केंद्रात नितीश कुमार यांना कोणती जबाबदारी मिळते यावरही सर्व काही अवलंबून राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद सोडून केंद्रात एखादी जबाबदारी घेण्याचा निर्णय निश्चितच सोपा नसतो. पण ज्याअर्थी नितीश कुमार यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याने हा निर्णय घेतला आहे, त्याअर्थी केंद्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे राखून ठेवण्यात आले आहे हे उघड आहे. बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजपाचा स्वतःचा मुख्यमंत्री कधीही झाला नसल्याने भाजपसाठीसुद्धा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. युती करून सत्तेमध्ये राहणार्या भाजपाला नेहमीच उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र त्यांनी योग्य संधी साधून बिहारची कमानसुद्धा आपल्या हातात घेतली. बिहारमधील पुढील विधानसभा निवडणूक होण्यास अद्याप चार वर्षांचा कालावधी बाकी आहे. या कालावधीमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कशाप्रकारे काम करते आणि याच कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल कशा पद्धतीने एकत्र राहतात यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये जातीय समीकरण लक्षात घेऊनच मुख्यमंत्रिपदाची निवड करणार्या भारतीय जनता पक्षाने बिहारचे जातीय समीकरण लक्षात घेऊनच सम्राट चौधरी यांच्या हातात सूत्रे दिली आहेत हे सुद्धा लक्षणीय आहे. साहजिकच सम्राट चौधरी यांची बिहारमधील राजकीय खेळी आणि नितीश कुमार यांची दिल्लीमधील नवीन राजकीय खेळी यावर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.