Politics : राजकारणात पराभव उदारपणे आणि विजय विनम्रपणे (Politics) स्वीकारायचा असतो. यात गल्लत केली तर ते जनतेला रूचत नाही आणि स्वत:च्या राजकीय भविष्याच्या दृष्टीनेही ते अडचणीचे ठरते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या पराभवामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत नैराश्याचे वातावरण असणे स्वाभाविक आहे. काँग्रेसला केरळमध्ये मिळालेली सत्ता आणि तमिळनाडूत तब्बल 59 वर्षांनी या पक्षाने सत्तेत केलेला प्रवेश ही त्यांची जमेची बाजू. तथापि, पराभव आणि विजय अशा दोन्ही बाबींचा एकाच वेळी स्वीकार (Politics) करताना जो सभ्यपणा दाखवायला हवा आहे तो दाखवला जात नसून उशीर होण्याच्या अगोदरच वेळीच सावरलेले बरे याचे भान विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ठेवायला हवे. स्टॅलिन यांच्या आमदार पुत्राने जरी ते ठेवले नसेल तरी स्वत: स्टॅलिन यांनी मात्र राजकीय सभ्यता दाखवली. महत्त्वाचे म्हणजे तमिळनाडूत स्टॅलिन यांचा पराभव करून सत्तेत आलेल्या विजय यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक दाखवून दिली. Politics अन्य नेत्यांना विशेषत: ममतांना पराभवानंतर संयम राखता येत नसल्याचे दिसते आहे, तर राहुल गांधी यांना विजयानंतर संयम राखता येत नसल्याचे स्पष्ट होते आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर वास्तविक काँग्रेसने सत्ता हस्तगत केली नव्हती. तरीही त्या पक्षाने अगदी पीछाडीवरून मुसंडी मारत शंभरी गाठण्याची किमया केली ही चांगली बाब. ते झाले तरी आपण सत्तेत नाही आणि विरोधात असल्यामुळे आपली जबाबदारी अधिकच वाढते याचे ना राहुल यांना स्मरण राहते ना त्यांच्यासोबत असलेल्या खास नेत्यांना आणि प्रवक्त्यांना. दोन दिवसांपासून राहुल गांधी त्यांच्या रायबरेली मतदार संघाच्या दौर्यावर आहेत. याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्यावर होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने सरकारच्या चुकांची चिरफाड करणे आणि सरकारवर टीका करणे अपेक्षित आहेच. ते राहुल यांनी केले तर त्यात त्यांची काही चूक झाली असे मानण्याचे कारण नाही. मात्र सरकारवर आणि सरकारच्या प्रमुखावर टीका करताना जी भाषा वापरणे आवश्यक असते त्याची मर्यादा ओलांडली (Politics) जाणार नाही याचीही दक्षता घेतली जायला हवी. देशातील महागाई आणि दारावर उभे ठाकलेले आर्थिक संकट या अनुशंगाने बोलताना राहुल यांनी संविधानाचाही व त्यावरील कथित हल्ल्यांचा उल्लेख केला. ते करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शरसंधान साधले. ते इतके घातक आणि विखारी होते की अलीकडच्या भारताच्या राजकीय इतिहासात कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने सरकारच्या प्रमुखाबाबत असे शब्दप्रयोग केल्याचे ऐकिवात नाही. सरकारच्या बाजूनेही विरोधकांवर अशा शब्दांत टीका झाल्याचे क्वचितच उदाहरण असावे. मोदी यांच्या परदेश दौर्यावर त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी दिली. तो धागा पकडत सरकारची कामगिरी भारतासाठी मिझरी म्हणजे क्लेषदायक असल्याची संयमित टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी यांना लक्ष्य करताना राहुल यांनाही तशीच टीका करता आली असती. ते त्यांना का जमत नाही हे तेच जाणोत. पंतप्रधान परदेशात असताना किंवा ते स्वत: परदेशात गेले असतानाच राहुल अशी वादग्रस्त विधाने करतात. त्यांचे टायमिंग चुकते की ते हेच टायमिंग साधतात याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. या सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची याच सुमारास आलेली प्रगल्भ टिप्पणी विरोधी पक्षातील सगळ्यांनी लक्षात घ्यावी. पंतप्रधान मोदी यांच्याशी आपले राजकीय मतभेद असले, तरी पंतप्रधान म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा राखण्यासाठी काम करत आहेत हे विसरता कामा नये. इंदिरा गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग या नेत्यांनी नेहमीच देशाचे भविष्य आणि प्रतिष्ठा आपल्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवली असे नमूद करतानाच पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या रशिया दौर्यातील एका प्रसंगाचाही उल्लेख केला. आपण भारतातील 40 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला तर आपण ते कदापिही सहन करणार नाही असे इंदिराजींनी रशियाच्या अधिकार्यांना ठणकावून सांगितल्याचा किस्सा पवार यांनी सांगितला. दिवगंत अटलबिहारी वाजपेयी यांची अनेक भाषणे आजही सर्व माध्यमांत उपलब्ध आहेत. अटलजींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी अनेकदा कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले आहेत. संसदेवर हल्ला झाला होता तेव्हा सोनिया गांधी व त्यांनी परस्परांची आत्मीयतेने कशी चौकशी केली होती हेही अटलजी यांनी सांगितले. एवढे कशाला राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना संसदीय राजकारणात प्रवेश करण्याला अगदी काही महिनेच झाले आहेत. त्यांची संसदेतील आणि बाहेरची भाषणे आणि माध्यमांशीही संवाद साधतानाची सचोटी व हतोटी विलक्षण ठरते. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीतील प्रियंका यांचे मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी अगदी सहजसुंदरपणे चर्चा करतानाचे फोटोही भारतीय राजकारणाच्या प्रगल्भतेची साक्ष देणारे होते. हे सगळे राहुल यांना माहिती नसावे असे मुळीच नाही. मात्र त्यांच्याकडून त्याच त्याच चुका होत आहेत. पंतप्रधान देशाचे असतात, पक्षाचे नाही आणि विरोधी पक्षनेताही देशाच्या जनतेचा आवाज असतो हे राहुल यांनी ध्यानात ठेवले तर बरेच होईल.