संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली जात असतानाच भारताला एक धक्का बसला. दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात तेजस दुर्घटनाग्रस्त झाले. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. भारतीय तंत्रज्ञांच्या तंत्रदृष्टीचा आणि अथक परिश्रम व इच्छाशक्तीचा परिपाक असलेले हे तेजस अचानक असे कोसळणे हा सर्व भारतीयांच्या आणि विशेषत: त्या स्वप्नासाठी वाटचाल करणार्या सगळ्यांनाच धक्का होता. झाला प्रकार अस्वस्थ करणारा आणि नाउमेद करणारा आहे. त्यावर चर्चा आणि सल्ले सुरू आहेत. तथापि, स्वप्नांना धक्का बसला असला तरी पुढील वाटचाल आपण करूच शकणार नाही, असे मानण्याचे कारण नाही आणि नव्या उमेदीने पुढेच जात राहिले पाहिजे, असा सकारात्मक विचारही प्रबळ होतो आहे. तेजस भारतासाठी का महत्त्वाचे आहे आणि त्याची दुर्घटना आपल्याला का हादरवणारी आहे ते प्रथम समजून घ्यायला हवे. तेजस हे भारताने बनवलेले पहिले लढाऊ विमान आहे. चाळीस वर्षांच्या तपश्चर्येचे ते फळ आहे. अनेक हातांनी घेतलेले कष्ट, अभियंत्यांनी गाळलेला घाम आणि संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे प्रत्येकाने पाहिलेले ते स्वप्न आहे. देश महाशक्ती व्हावा आणि होणार याची चर्चा होते. त्या दिशेने प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरूही आहेत. त्यात कोणा एका सरकारचीच फक्त भूमिका नाही, तर सर्व भारतीयांच्या प्रयत्नांनीच ते साध्य होणार आहे. तेजसची निर्मिती आपण हे ध्येय निश्चितच गाठू शकू असा विश्वास देणारी होती. भारत काय करू शकतो हे दाखवण्याची संधी ‘दुबई एअर शो 2025’ मध्ये मिळाली होती. त्याच संधीच्या वेळी तेजस कोसळले. केवळ आर्थिक नुकसान झाले नाही, तर सोबतच विंग कमांडर नमांश स्याल हा एक धाडसी मोहराही भारताने गमावला. तेजसच्या करामती ते दाखवत असतानाच अखेरच्या दोन सेकंदातच घात झाला. ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारताच्या तिन्ही दलांनी योग्य समन्वयाने केलेली कारवाई संपूर्ण जगाने पाहिली होती. पाकिस्तानला त्यांच्या मित्रराष्ट्रांकडून अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि इतरही मदत प्रत्यक्ष संघर्षाच्या वेळी केली गेल्याचे नंतर उघड झाले. हे सगळे असतानाही भारताने पाकिस्तानला जबर तडाखा दिला आणि त्यांच्याकडचे दहशतवादी तळ आणि दहशतवादी उद्ध्वस्त केले. ही कमाल भारतीय लष्कराची तर होतीच, पण त्यात भारताच्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांचाही सिंहांचा वाटा होता. भारताच्या या शस्त्रांकडे आणि त्यांच्या क्षमतेकडे पूर्वीपासूनच काही देशांचे लक्ष वेधले गेले होते आणि ऑपरेशन सिंदूर त्यांच्याकरता एक प्रत्यक्ष पुरावाच होते. दुबईच्या एअर शोला इजिप्त, अर्जेंटिना, फिलिपिन्स, नायजेरिया आदी काही देशांच्या प्रतिनिधींची हजेरी होती. या देशांनी भारतीय बनावटीच्या तेजससह अन्य काही संरक्षण उत्पादनांमध्ये स्वारस्य दाखवले आहे. त्याच आधारावर जगात कधीकाळी संरक्षण सामग्रीचा सगळ्यात मोठा आयातदार देश असलेला भारत आज निर्यातही करण्यास सक्षम झाल्याची खात्री झाल्यामुळे स्वावलंबनाच्या घोषणाही देताना दिसतो. त्यामुळेच तेजसची अनपेक्षित आणि अकल्पित दुर्घटना अचानक समोर आल्यामुळे काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, पूर्णविरामच लागला किंवा लागेल अशा शक्यतांना थारा द्यायला नको. तेजस हे काही दुर्घटनाग्रस्त झालेले पहिले विमान नाही. जगात ज्या देशांचे आणि ज्या विमानांचे नाणे आज खणखणीत वाजते त्या देशांनाही अशा दुर्घटनांचा सामना करावा लागला आहे. तेजसच्या अपघातानंतर विविध माध्यमांनी अशा अपघातांची आकडेवारीसह सर्वंकष माहितीही सादर केली आहे. त्यात अमेरिकेचे एफ-35 आणि एफ-16 या अत्याधुनिक विमानांचाही समावेश आहे. जगातील अत्यंत भव्य आणि प्रचंड खर्चिक असणार्या या विमान निर्मितीच्या प्रकल्पांनाही दुर्घटनांचा सामना करावा लागला. ही विमानेही कोसळली, एकदा नाही तर एफ-35 ला 11 वेळा आणि एफ-16 ला तब्बल 650 वेळा दुर्घटनांचा सामना करावा लागला. भारतात सुखोई विमानांची बरीच चर्चा असते. तथापि, पॅरिसमधील 1999 च्या एअर शोमध्ये एसयू-30 असेच क्रॅश झाले होते. तरीही नंतर भारताने त्यात स्वारस्य दाखवले आणि रशियावर विश्वास दर्शवत त्यांच्याकडून या विमानांची खरेदी केली. ही आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे. परदेशी सामग्रीवरचे अवलंबित्व कमी करायचे यावर भारताचा भर आहे. एखाद्या देशाकडून तुम्ही विमान अथवा जहाज घेतले तर त्यावेळेचे त्याचे मूल्य चुकवावेच लागते, मात्र नंतरही त्याची देखभाल, दुरूस्ती आणि सुटे भाग यावरचा खर्च मोठा असतो. संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात आपण सक्षम झालो तर ते परावलंबित्व कमी करेलच मात्र निर्यातीतून आपण अर्थव्यवस्थेला हातभारही लावू शकतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपला प्रवास योग्यपणे सुरू असल्याचे 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीने सिद्धही केले आहे. आपल्या संरक्षण क्षेत्रात विक्रमी 1.54 लाख कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे. आकाश आणि ब्रह्मोसचे उत्पादन हे या सगळ्याची साक्ष देतात. प्रामाणिकपणे मान्य करायचे झाल्यास तेजसची दुर्घटना भारताला एक झटका नक्कीच आहे. या विमानात रूची दाखवत त्याच्या खरेदीची तयारी करणार्या देशांच्या मनात शंकाही निर्माण झाली असणार. शेवटी कोणताही देश आपला पैसा आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे वैमानिकांचे प्राण पणाला लावणार नाही. त्यामुळे दुबईच्या घटनेत पुढे काय होते आणि भारत काय दुरूस्ती करून पुन्हा आम्हाला आश्वस्त करतो याकडे त्यांचे लक्ष असेल. भारतानेही नाउमेद व्हायला नको. दुर्घटना घडतात, मात्र त्यात सुधारणाही करता येते. पुन्हा विश्वासही प्राप्त करता येतो, फक्त त्यात दिरंगाई करायला नको. तेजस आपणच बनवले आहे, त्याचे दोष आपणच दूर करू शकू.