गेल्या दोन-तीन दिवसात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील अशा दोन घटना घडल्या आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी शंकराचार्यांचे प्रयागराजच्या संगमावर जे पारंपरिक स्नान होणार होते त्या स्नानालाच अडथळा आणला गेला, या स्नानासाठी निघालेले शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद यांना आणि त्यांच्या समर्थकांना घाटावरून हुसकावून लावण्यात आले. त्यांच्या समर्थक संन्यासी भक्तांची तर पोलीस यंत्रणेकडून शब्दशः ससेहोलपट करण्यात आली. शंकराचार्यांचा रथ तिथून काही माणसांकरवी एक किलोमीटर लांब नेऊन सोडण्यात आला. दुसरी घटना वाराणसीच्या गंगा काठावरील आहे. तेथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी जे मंदिर आणि घाट उभारला होता त्याची मोडतोड केली गेली. घटनास्थळी पडलेल्या मूर्तींचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. या घटनेवरही देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला. मनकर्णिका घाटावरील घटनेच्या संबंधात मग थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन असा खुलासा केला आहे की, मनकर्णिका घाटावर कोणतीही मोडतोड झालेली नाही आणि जे व्हिडिओ सोशल मीडियात पसरवले गेले आहेत ते एआय जनरेटेड व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ पसरवणार्या आठ जणांच्या विरोधात त्यांच्या सरकारने गुन्हेही दाखल केले. पण वस्तुस्थिती अशी आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच याबाबतीत दिलेली माहिती खोटी असल्याचे प्रशासनातल्या अधिकार्यांच्या वक्तव्यातूनच स्पष्ट झाले आहे. वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांनीही घाटावरील मूर्तीची मोडतोड झाल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यावर सारवासारव करताना त्यांनी असे नमूद केले की या घाटाचा आता पुनर्विकास केला जाणार असून तेथील प्राचीन मूर्ती नव्याने साकारल्या जाणार्या मंदिरात प्रस्थापित केल्या जातील. या अधिकार्यांचा काहीही खुलासा केला असला तरी तेथे असा प्रकारच घडला नाही आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ क्लिप एआय जनरेटेड आहेत हा मुख्यमंत्री योगींचा दावा तद्दन खोटा ठरला आहे. मनकर्णिका घाट फोडला जात असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या घराण्यातील वारसांनी आणि त्यांच्याशी संबंधित विश्वस्तानी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करीत तेथील मूर्ती स्वतः जतन करण्याची तयारी दर्शवली होती; पण त्याला प्रशासनाने दाद दिली नाही. या घटनेबद्दल भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी खासदार सुमित्रा महाजन यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही घटना घडली नाही असे मुख्यमंत्री योगी जाहीरपणे कसे काय म्हणू शकतात हा प्रश्न आता लोकांना पडला आहे. हा मुद्दा उचलून धरणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावरही मनकर्णिका घाट प्रकरणातील एआय जनरेटेड व्हिडिओ प्रसारित केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वस्तुस्थिती उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री हे गुन्हे मागे घेणार आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात वाराणसीच्या या जुन्या घाटाचे प्राचीन सौंदर्य काळजीपूर्वक जपणे अपेक्षित असताना तेथे विकासाच्या नावाखाली सरसकट बुलडोजर चालवणे हे कोणत्या गणितात बसते हे लोकांच्या लक्षात येईनासे झाले आहे. योगी सरकारला आणि पर्यायाने मोदी सरकारला हिंदू धर्मियांच्या प्राचीन मंदिरांविषयीही आता कसलीही आस्था उरलेली नाही काय असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे. उत्तर प्रदेशातच प्रयागराजच्या संगमावर शंकराचार्यांचाही जो अपमान झाला, त्यावरूनही जनमानस संतप्त झाले आहे. तेथील घटनेत शंकराचार्यांना नुसतेच स्नान करण्यापासून रोखले गेले नाही तर, त्यांची जाणीवपूर्वक अवहेलना केली गेली त्यांचे पवित्र छत्र पाडण्यात आले. त्यांना अक्षरशः हुसकावून लावण्यात आले. ही सगळी दृश्य कालपासून सोशल मीडियावर सगळीकडे पसरली असून लोकांकडून विशेषतः हिंदू भाविकांकडून मोदी योगींचा निषेध केला जात आहे. शंकराचार्यांना संगमावरील स्नानापासून मुघलांच्या किंवा औरंगजेबाच्या काळीही रोखले गेले नव्हते ते काम आज मोदी आणि योगी या दोघांनी करून दाखवले आहे, अशा शब्दात भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या प्रतिक्रियांची दखल मोदी आणि योगी या दोघांना घ्यावीच लागेल आणि याबाबतचा समर्पक खुलासा हिंदू भाविकांपुढे करावा लागेल. मुळात कुठल्या कारणावरून शंकराचार्यांना रोखले गेले आणि त्यांना तेथून हूसकावून लावले गेले याचे नेमके कारण प्रशासनाकडूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मोदी आणि योगी सरकारच्या भूमिकांच्या संबंधात सातत्याने आवाज उठवला आहे, त्यामुळे या दोन ज्येष्ठ नेत्यांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली असावी, म्हणूनच थेट शंकराचार्यांवरच दहशत माजवण्याचा प्रयत्न प्रशासनाचा वापर करून झाला असाही आरोप होत आहे. या घटने संदर्भात शंकराचार्यांनी ठिकठिकाणी मुलाखती देत नेमक्या घटनेचे वर्णन केले आहे. एके ठिकाणी तर त्यांनी असे म्हटले आहे की, घाटावर मुद्दाम चेंगराचेंगरीचा प्रसंग घडवून त्याच्या आधारे आपल्याला ठार मारण्याचा हा कट होता. आता त्यांच्या आरोपात तथ्य किती या अनुषंगानेही तपास व्हायला हवा. पण या दोन्ही घटना हिंदू भाविकांच्या श्रद्धेला धक्का देणार्या ठरल्या आहेत, ही कृत्ये अधर्मी स्वरूपाची आहेत असे हिंदू भाविकांचे म्हणणे आहे. आपण काहीही केले तरी ते धर्माच्या हिताचे असते असे लोक गृहीत धरून चालले आहेत, अशा भ्रमात जर सध्याचे राज्यकर्ते असतील तर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल एवढे मात्र नक्की.