62 वर्षांपूर्वी प्रभात : आदिमानवाच्या वास्तवाची गुहा

कामगारांसाठी पेन्शन योजना
नवी दिल्ली, ता. 22 – कामगारांसाठी सध्या चालू असलेल्या प्रॉव्हिडंट फंड योजनांचे कायदेशीर पेन्शन योजनेत रूपांतर करावे अशी एक सूचना भारत सरकारने नेमलेल्या सामाजिक सुरक्षिततेवरील अभ्यास गटाने केली आहे. या गटाने आपल्या अहवालात एका वृद्धापकाळ, अपंगत्व, देखरेख पेन्शन व ग्रॅच्युइटी योजनेची शिफारस केली आहे.
या योजनेनुसार सेवानिवृत्तीच्यावेळी कामगारांच्या योजना भागविण्याइतकी ग्रॅच्युईटी मिळून बाकीच्या पैशांचा त्यांस जास्तीतजास्त सेवानिवृत्तीचे लाभासाठी विनियोग करता येईल. कामगारास वाजवी दराने पेन्शन मिळावी म्हणून कामगारांनी आणि मालकांनी भरावयाच्या पगाराच्या साडेसहा टक्के या वर्गणीत ताबडतोब आठ पूर्णांक एकतृतीयांश टक्क्यापर्यंत वाढ करावी अशी सूचना या गटाने केली.
जळगाव जिल्ह्यातील उत्खननांतील अवशेष
नवी दिल्ली – मुंबई राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वहाल येथे 1957 मध्ये करण्यात आलेल्या 35 फूट खोल उत्खननात निरनिराळ्या चार संस्कृतीतील मातीच्या भांड्यांचे व पुराणवस्तूंचे अवशेष सापडले. वहाल समोरच्या टेकवाडा येथील उत्खननात रंगीत भांडी, कटोरे व काचेचे मणी इत्यादीचे अवशेष सापडले असून ते कॅलिऑलिथिक काळातील असावेत.
आदिमानवाच्या वास्तवाची गुहा
गॉस्को – पूर्व पाषाणयुगातील म्हणजे दोन लाख वर्षांपूर्वींच्या काळातील आदिमानव ज्या गुहांत राहत असत तसली एक गुहा कझगस्तानात कारा ताऊ पर्वत रांगेत पहिल्यांदाच आढळून आली आहे. गेली दोन वर्षे या भागांत पुराणवस्तू शास्त्रीय उत्खनन चालू आहे.
या गुहेत काही पाषाण आयुधेही आढळून आली आहेत, तसेच प्राण्यांच्या हाडांचेही तेथे अवशेष सापडले आहे. तेथे सापडलेले अवशेष खोक्यात भरून ते आल्मा आवा येथील प्रयोगशाळेत अधिक संशोधनार्थ रवाना करण्यात आले आहेत.
अशाप्रकारची पाषाण आयुधे सोव्हिएत युनियनमध्ये आजवर केवळ कॉकेस क्रिमिया, उझबेकिस्तान व सैबेरियातच आढळून आली आहेत. परदेशात केवळ भारतातच आढळून आली आहेत. यापूर्वी तीन वर्षांमागे उत्तर पाषाणयुगीन आयुधे पूर्व कझगस्तानात सापडली होती.
…अरबांशी विद्रोहाचे धोरण अद्यापि चालू
कैरो – तिसरे जागतिक युद्ध सुरू झाले आहे, असे संयुक्त अरब प्रजासत्ताकाचे अध्यक्ष नासर यांना वाटत असल्याचे त्यांच्या निकटच्या मित्रांनी सांगितले.
अल अहरामचे संपादक महमद हुसैन हैकल यांच्या म्हणण्यावरून असे दिसते की, आधुनिक अस्त्रांनी तिसरे युद्ध अशक्य केले असल्यामुळे आता “शीत’ युद्धच चालू आहे, असे नासर यांचे मत आहे. पश्चिमी राष्ट्रांशी स्नेहसंबंध स्थापून सहअस्तित्वाची प्रतिष्ठापना करावी असा अरबांचा प्रयत्न आहे. परंतु पश्चिमी राष्ट्रांनी विश्वासघाताचे धोरण सोडलेले नाही.



