नवी दिल्ली – लँड फॉर जॉब प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा समन्स जारी केले आहेत. या ईडीने तेजस्वी यादव यांना पुढील महिन्यात ५ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी लालू यादव यांना पुढील आठवड्यात म्हणजे 27 डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
या प्रकरणी ईडीने 11 एप्रिल रोजी तेजस्वी यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. परंतु ईडीने लालू यादव यांना तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. लालू प्रसाद कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित कात्याल यांची चौकशी केल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले आहे. त्याला ईडीने नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.
कोरोना वाढतोय..
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून केरळ आणि कर्नाटकमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
गेल्या २४ तासात एकूण ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६६ रुग्ण केरळमधील आहेत, तर शेजारील कर्नाटकमध्ये ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशभरात करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३,४२० इतकी आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.