‘खिचडी घोटाळा’प्रकरणी ईडीचे 7 ठिकाणी छापे; ठाकरे गटाच्या नेत्यांचा घोटाळ्यात समावेश?

मुंबई – करोना काळातील स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी 7 ठिकाणी छापे टाकले. या कथित घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणामध्ये सुजित पाटकर, सुनील उर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्स वन मल्टी सर्व्हिसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा केटररचे भागीदार आणि महापालिकेतील अन्य अधिकाऱ्यांचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागाने फसवणुकीसह अन्य गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने साडेसहा कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याच्या मूळ प्रकरणातील एफआयआर दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत ईडीकडून तपास करण्यात येत आहे.
यामध्ये ठाकरे गटाचे नेते सुजित पाटकर यांना सल्लागार सेवा देण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट्सकडून 45 लाख रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांच्या बॅंक खात्यावर 53 लाख रुपये आणि सूरज चव्हाण याच्या खात्यावर 37 लाख रुपये वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.





