ED Raid – मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात एका व्यावसायिकाने पत्नीसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सीहोर आणि इंदूर येथील त्यांच्या मालमत्तांची झडती घेतल्याच्या आठवडाभरातच दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, कथित सुसाईड नोटमध्ये व्यापारी मनोज परमार यांनी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना त्यांच्या मुलांना एकटे सोडू नका, असे आवाहन केले. तसेच ईडी आणि भाजप नेत्यांनी छळ केल्याचे म्हटले आहे. यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईडीने 5 डिसेंबर रोजी उद्योगपती मनोज परमार आणि त्याची पत्नी नेहा यांच्या इंदूर आणि सीहोरमधील चार ठिकाणांवर धाड टाकत झडती घेतली होती. पंजाब नॅशनल बँकेच्या 6 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी मनोज परमार यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या छाप्यांमध्ये, अधिकाऱ्यांनी गोठवलेल्या बँक खात्यातील 3.5 लाख रुपयासह जंगम आणि जंगम मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर लगेचच मनोज परमार यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासूनच ते तणावाखाली होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मनोज परमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा पासून ते प्रकाशझोतात आले होते. परमार यांना यावेळी राहुल गांधी यांना छोटी भेट देखील दिली होती. मनोज परमार यांनी आत्महत्येआधी सुसाईड नोटदेखील लिहिली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी ईडीचे सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू यांच्यावर छापेमारीत छळ, शारीरिक हल्ला आणि तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. साहू यांनी मनोज परमार यांना त्यांच्या मुलांना भाजपमध्ये सामील करण्यास आणि राहुल गांधींविरोधात वक्तव्ये करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप या चिठ्ठीत करण्यात आला आहे.