अनिल देशमुखांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात ईडीचे आरोपपत्र

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांवर सक्तवसुली संचलनालयाने आज आरोपपत्र दाखल केले. मनी लॉन्डरिंग प्रकणी हे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.
अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सहायक कुंदन शिंदे यांच्याविरोधात “पीएमएलए’ कायद्यांतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोघांना यावर्षी जुलै महिन्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती.
हे दोघेही सध्या तुरुंगातच आहेत. या आरोपपत्राच्याबरोबर पुराव्यांची कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. मात्र अद्याप या आरोपपत्राची प्रत मिळणे बाकी आहे, असे शिंदे यांच्या वकिलांनी सांगितले.
शिंदे 6 जुलै पासून न्यायालयीन कोठडीमध्येच आहेत. पण त्यांची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही, त्यांना केवळ ताब्यात घेण्यात आले आहे आणि हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे ऍड. एझाज खान यांनी सांगितले.
देशमुख आणि त्यांयांच्याविरोधात सीबाआयने 21 एप्रिलरोजी भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याबद्दल एफआयआर दाखल केल्यावर ईडीने या संदर्भात तपासाला सुरूवात केली होती. देशमुख यांना ईडीने पाचवेळेस समन्स बजावले आहे मात्र ते अद्याप चौकशीला उपस्थित राहिलेले नाहीत.



