शिक्षक भरती प्रकरणात ईडीची बंगालमध्ये पुन्हा छापेमारी..

नवी दिल्ली – पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाकडून आज छापेमारी करण्यात आली. प्राथमिक शाळांमधील भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ही छापेमारी सुरू आहे असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
निमलष्करी दलाच्या संरक्षणात ईडीच्या पथकांनी कोलकाताच्या दक्षिणेकडील नक्ताला येथील एका कार्यालयावर आणि या बिल्डरच्या तीन फ्लॅटवर छापे टाकले, त्यापैकी एक फ्लॅट चटर्जी यांच्या घरासमोर आहे. या घोटाळ्यात बिल्डरचा मोठा हात आहे असा आरोप आहे. या घोटाळ्यातून मिळालेले पैसे वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात या बिल्डरने अटक केलेल्या मंत्र्याला मदत केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात केंद्रीय ईडीने जुलै 2022 मध्ये चॅटर्जी यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वी दोनदा बिल्डरची चौकशी केली होती.
दक्षिण कोलकाता येथील गोलपार्क भागातील एका ज्वेलर्सच्या शोरूम आणि निवासस्थानावरही ईडीचे अधिकारी छापे टाकत आहेत. बिल्डर आणि ज्वेलर या दोघांनीही माजी चॅटर्जी यांना विविध प्रकल्प आणि योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास मदत केली आहे असा ईडीचा दावा आहे.





