Chia Seeds: सध्या फिटनेस आणि हेल्थबद्दल जागरूक असलेल्या अनेक लोकांच्या आहारात चिया सीड्सचा समावेश दिसून येतो. सोशल मीडियावर हेल्थ इन्फ्लुएन्सर्सपासून सामान्य लोकांपर्यंत सगळेच चिया सीड्स खाण्याचा सल्ला देताना दिसतात. वजन कमी करणे, पचन सुधारणे, त्वचा चमकदार ठेवणे अशा अनेक फायद्यांमुळे चिया सीड्सला “सुपरफूड” म्हटलं जातं. मात्र त्याचे काही दुष्परिणामही असू शकतात, हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट बराच वेळ भरलेलं राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही अनेक जण याचा वापर करतात. मात्र अचानक जास्त प्रमाणात चिया सीड्स खायला सुरुवात केल्यास गॅस, पोटदुखी आणि ब्लोटिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीराला हाय फायबर आहाराची सवय हळूहळू लावणं गरजेचं असतं. (Chia Seeds) चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामुळे ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. काही संशोधनानुसार यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यासही मदत मिळते. प्रोटीनच्या दृष्टीनेही चिया सीड्स उपयुक्त मानले जातात. यात शरीरासाठी आवश्यक असलेले नऊ प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. हे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या रिपेअरिंग प्रक्रियेसाठी मदत करतात. त्यामुळे व्यायाम करणारे आणि फिटनेसकडे लक्ष देणारे लोक चिया सीड्स नियमित खातात. Chia Seeds: रोज चिया सीड्स खाताय? फायदे जितके मोठे, तितकेच नुकसानही जाणून घ्या ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठीही चिया सीड्स उपयोगी ठरू शकतात. यात असलेलं फायबर शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण अचानक वाढू देत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या काही लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो. चिया सीड्स पाण्यात भिजवून, स्मूदीमध्ये, ओट्समध्ये किंवा दह्यासोबत खाल्ले जातात. Chia Seeds मात्र त्याचे काही तोटेही आहेत. काही लोकांना चिया सीड्सची अॅलर्जी असू शकते. चक्कर येणे, डोकेदुखी, चेहऱ्यावर सूज येणे किंवा त्वचेवर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसू शकतात. विशेषतः ज्यांना तीळ किंवा इतर बियांची अॅलर्जी असते, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. (Chia Seeds) किडनीचे आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय चिया सीड्स खाऊ नयेत. कारण यात पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असू शकतं. तसेच चिया सीड्स कोरडे खाल्ले तर ते शरीरातील पाणी शोषून घेतात आणि अन्ननलिकेत किंवा आतड्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ते नेहमी भिजवूनच खावेत. अनेकांना वाटतं की चिया सीड्स खाल्ल्याने वजन लगेच कमी होतं. मात्र फक्त चिया सीड्स खाऊन उपयोग होत नाही. योग्य आहार आणि व्यायामाशिवाय वजन कमी होणं कठीण आहे. उलट जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यताही असते.