राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली – नववर्षाचे स्वागत करत असताना मध्यरात्री दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. हे भूकंपाचे धक्के मध्यरात्री सुमारे 1 वाजून 19 मिनिटांनी जाणवले. या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या झज्जर येथे होते.
या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली, तसेच त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर आत होती, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. अचानक जाणवलेल्या या भूंकपाचे धक्क्यामुळे अनेकांनी घरातून आणि हॉटेलमधून पळ काढत रस्त्यावर धाव घेतली. काही काळ हे नागरिक बाहेरचं थांबले, मात्र भूकंपाचा धोका टळल्याचे लक्षात येताच नागरिक पुन्हा घरी आणि हॉटेलात गेले.
दरम्यान, 2023 या नवं वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असताना अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरिक दहशतीखाली होते. कारण दिल्लीत देखील अनेक पर्यटक न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी आले होते.





