दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के! सलग दुसऱ्या दिवशी हादरली जमीन

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७:४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.७ नोंदली गेली, तर त्याचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी गुरुवारी (१० जुलै) सकाळी ९:०४ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्रही झज्जर येथेच होते.
स्थानिक नागरिक अर्जुन यांनी न्यूज एजन्सी ANI शी बोलताना सांगितले, “भूकंपाचे धक्के जाणवले. मोठ्या इमारतींमध्ये काम करणाऱ्यांनी सावध राहावे. आम्ही मंडी हाउस येथे होतो तेव्हा धक्के बसले. नैसर्गिक आपत्तीसमोर आपण हतबल आहोत, पण स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. कालही १०-१५ सेकंदांचा भूकंप आला होता.” सोशल मीडियावरही दिल्लीकरांनी आपले अनुभव व्यक्त केले.
एका X वापरकर्त्याने लिहिले, “दिल्लीत पुन्हा भूकंप! घरात राहिलो तर भूकंप, बाहेर गेलो तर पूर!” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “भूकंप, वादळ, आपत्ती… दिल्लीकरांचे आयुष्य एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखे आहे!”गुरुवारी रोहतक, गुरुग्राम, पानीपत, हिसार आणि मेरठ येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत धक्के जाणवताच घबराट पसरली आणि लोक मोकळ्या जागी धावले. अनेकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. या घटनेने दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


