तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – सार्वजनिक गणेश उत्सवात गणरायाचे आगमन करण्यासाठी तळेगाव दाभाडे शहर परिसरातील ढोल-ताशा पथक सध्या जोरदार सराव करत आहेत. दररोज सायंकाळी सहा ते नऊ या काळात पारंपारिक ढोल ताशाचा आवाज वेगवेगळ्या भागातून येत आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या तळेगाव शहरात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याची भव्यता आणि पावित्र्य शहरातील विविध मंडळांकडून जपले जात आहे. तळेगाव शहरात ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वजनिक गणेश मंडळाचे मानाचे पथक आहे. याशिवाय चावडी चौक तरुण मंडळ, मानवंदना ढोल ताशा पथक, गणेश तरुण मंडळ ढोल ताशा पथक वजर तरुण मंडळ ढोल ताशा पथक, शिवराष्ट्र ढोल ताशा पथक, संताजी ढोल ताशा पथक, अमर हिंद, जय भवानी, अमर खडकेश्वर यासारखी पथके सध्या ढोल-ताशा पथकाच्या सरावात गुंतली आहेत. मानवंदना ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष अमोल शेटे आणि त्यांच्या सुमारे २०० वादकांकडून दररोज वादनाच्या सरावाचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी पुष्कर कोगदे, नितीन कुलकर्णी हे प्रशिक्षक विशेष प्रयत्न करत आहेत. या पथकामध्ये सर्वाधिक तरुणी-महिला वाद्य कामासाठी सहभागी होताना दिसतात. हे पथक तळेगाव शहरातील सार्वजनिक गणपती बरोबरच पुणे, पिंपरी चिंचवड आणि अन्य भागामध्ये जाऊन उत्कृष्ट काम वाद्यकाम करत आहे. सार्वजनिक शिवजयंती, सार्वजनिक गणेशोत्सव अथवा ग्रामदेवतेचा उत्सव असो या उत्सवात डीजेच्या तालावर फिरकण्यापेक्षा आपल्या पारंपारिक आणि सांस्कृतिक खेळामध्ये सहभागी होणे यासाठी आम्ही हे मानवंदना ढोल पथक सुरू करून तरुणाईला एक दिशा देण्याचे काम करत आहोत. – अमोल शेटे, संस्थापक अध्यक्ष, मानवंदना ढोल ताशा पथक