E-Governance Awards – मुख्यमंत्री यांच्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासनिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत कार्यालयांची संकेतस्थळे, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन माहिती फलक, व्हॉट्सॲप संवाद प्रणाली, शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर अशा सात सर्वंकष निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या कार्यक्रमातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली.१५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने नव्या तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक संकेतस्थळ विकसित केले आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉट्सॲपद्वारे सेवा, तक्रार निवारण तसेच माहिती देण्यासाठी नागरिकाभिमुख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच, पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे.राज्यातील २९ महापालिकांच्या झालेल्या मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेला २०० पैकी १८६.२५ गुण मिळून राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद यांच्याकडून करण्यात आले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत हे कामकाज करण्यात आल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान प्रमुख राहुल जगताप यांनी दिली.