नवी दिल्ली :- वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या ड्वेन ब्राव्होने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून आता आगामी आयपीएल हंगामामध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मेंटॉर म्हणून सहभागी होणार आहे. गौतम गंभीर यांनी भारताचे पुरुष संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारल्याने रिक्त झालेल्या जागेवर ब्राव्होची वर्णी लागली आहे.
४० वर्षांच्या ड्वेन ब्राव्होला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या हंगामातून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
त्याने आपल्या पोस्टमध्ये, व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून २१ वर्षांचा प्रवास अविश्वसनीय होता. या प्रवासात अनेक चढ उतार अनुभवले. मी प्रत्येक टप्प्यावर खेळाला १०० टक्के दिल्याने माझ्यासाठी हा प्रवास सुकर होता, असे ब्राव्होने म्हटले आहे.
ब्राव्होने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर त्याने २०२२ मध्ये शेवटचा आयपीएलचा सामना खेळाला होता. यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्स व अफगाणिस्थान संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून जोडला गेला होता. ड्वेन ब्राव्होने कारकिर्दीत ५८२ टी-२० लढती खेळल्या असून त्याने ६३१ गडी बाद करताना जवळपास ७ हजार धावा केल्या आहेत.