Pimpri : दुर्गादेवी टेकडी निसर्गाच्या सान्निध्यातील श्रद्धास्थान

रावेत : निगडीतील दुर्गादेवी टेकडी हे फक्त मंदिर वा उद्यान नसून शहरातील अनेक नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळ-संध्याकाळ या परिसरात व्यायामासाठी, पक्षी निरीक्षणासाठी, तसेच निवांत फिरण्यासाठी गर्दी असते. टेकडीवरील झाडांची हिरवाई, शांतता आणि जॉगिंग ट्रॅक यामुळे हा परिसर नागरिकांच्या तंदुरुस्तीचा केंद्रबिंदू ठरला आहे.
या टेकडीला ऐतिहासिक व आध्यात्मिक पार्श्वभूमीही आहे. १९७२ मध्ये पायथ्याशी खोदकामदरम्यान दुर्गादेवीची शिळा सापडली आणि येथे मंदिराची स्थापना झाली. महापालिकेने सभामंडप उभारून, परिसराचे सुशोभीकरण करून या स्थळाला वेगळी ओळख दिली. आज हे मंदिर भाविकांना आत्मिक समाधान देणारे केंद्र ठरले आहे.
नवरात्रोत्सवात दुर्गादेवी टेकडीला विशेष उत्साह लाभतो. भाविकांची गर्दी वाढते, वातावरण भक्तिमय होते. या काळात प्रवेशशुल्क माफ करून सर्वसामान्यांना दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. मात्र या ठिकाणाचे महत्त्व केवळ नवरात्रापुरते मर्यादित नाही. ७५ हेक्टरवर पसरलेला परिसर हे शहराचे “फुफ्फुस” आहे. जंगल व गर्द झाडीमुळे येथे जैवविविधतेचा खजिना आहे. त्यामुळे मंदिरासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही नागरिक व प्रशासनावर आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात दुर्गादेवी टेकडी श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवते. या ठिकाणाचे जतन हे केवळ परंपरेसाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा टिकवण्यासाठीही अत्यावश्यक आहे.





