जुन्नर – पुरातन किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या “शिवाजी ट्रेल’ संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन, निमगिरी, सिंदोळा व नारायणगड या सातही किल्ल्यांवर दुर्गपूजन केले. गेली 22 वर्षे ही मोहीम राबवित असून अभियानाची नोंद लिम्का बुकमध्ये झालेली आहे. यावर्षी संस्थेने महाराष्ट्रातील 140 किल्ल्यांवर दुर्गपूजन केले आहे.
याप्रसंगी किल्ले शिवनेरीवर नंदकुमार क्षीरसागर यांच्या हस्ते दुर्गपूजन केले. किल्ले चावंडवर शिवसह्याद्री भटकंती ग्रुप, जीवधन गडावर जुन्नर योग्य अभ्यास वर्ग आणि नारायणगावच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, निमगिरीवर संकल्प प्रतिष्ठान, सिंधोळ्यावर क्षत्रिय कुलावतंस प्रतिष्ठान, माणिकडोह तर पूर्व भागातील नारायणगडावर जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दुर्गपूजनाचा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी मंदिरात पूजा, आरती व गडदेवतांचे पूजन करून गडसंवर्धकांचे संरक्षण करण्याची प्रार्थना करण्यात आली. शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, उपाध्यक्ष रमेश खरमाळे, हिस्टरीचे अध्यक्ष विजय कोल्हे, मरहट्टे सह्याद्रीचे संस्थापक अमोल ढोबळे, शिवसह्याद्री ग्रुपचे रमेश भालेकर, डॉ. अमोल पुंडे, सुशांत जाधव, साईराज ढोबळे, प्रा. आकाश कांबळे, वनपाल शशिकांत मडके आदींनी सहकार्य केले.
दुर्गरक्षकांना सहकार्य केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. याप्रसंगी जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे व पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी स्वागत केले.