माती वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची दहशत

काळेश्‍वरी ट्रस्टच्यावतीने महसूल विभागासह पोलिसांना ग्रामस्थांचे निवेदन
वाई – वाईच्या पश्‍चिम भागात वाळू माफियांसह माती उपसा करणाऱ्या माती माफियांनी मोठ्या प्रमाणात मातीची अनधिकृत वाहतूक चालू केली आहे. महसूल विभागाला अंधारात ठेवून बेसुमार मातीचे उत्खनन केले जात आहे. या मातीची वाहतूक नंबर नसणाऱ्या डंपरच्या साहाय्याने करण्यात येत असून हे डंपर चालक बेभान वाहने चालवून समोरून येणाऱ्या वाहन चालकाला घासून जाण्याचा प्रकार वारंवार घडत आहेत. यातून वादाचे प्रकार घडून हे डंपर चालक अरेरावीची भाषा वापरून अनेक वेळा वादावरून गुद्द्यावर येतात, अनेकांना विनाकारण मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रशासनाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना पायबंद घालावा अन्यथा वाईच्या पश्‍चिम भागातील स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालक श्री. काळेश्‍वरी ट्रस्टच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून यांची वाहतूक कायमची बंद करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन श्री. काळेश्‍वरी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेवशेठ सणस, अमोल सणस व ग्रामस्थांनी वाईचे तहसीलदार व वाई पोलिसांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाच्या मेहरबानीने हे मातीची वाहतूक करणारे डंपर चालक बेभान झाले आहेत. त्यांना कोणाचीही भीती न राहिल्याने दहशत माजवून या भागात स्थानिक ग्रामस्थांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मातीची वाहतूक करण्यास कोणीही मज्जाव केलेला नाही, कित्येक वेळा या वाहन चालकांनी पाळीव जनावरांचासुद्धा अपघात केला आहे. तरीही हे वाहन चालक गाड्या आडव्या मारून या भागात प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना व स्थानिक टू व्हीलर चालकांना जाणीव पूर्वक त्रास देत आहेत. दरवर्षी वाईच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात मातीची वाहतूक करण्यात येते, त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत.

या पडलेल्या खड्यात पावसाळ्यात अनेक वेळा दुर्दैवी अपघातसुद्धा घडलेला आहे, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही या भागातील नागरिक कधीही डंपर चालकांना माती कुणाच्या परवानगीने वाहतूक करीत आहात असा जाब विचारीत नाहीत, तरीही हे धनदांडगे आपली दहशत माजविण्याच्या प्रयत्न करीत असतील तर या भागातील श्री. काळेश्‍वरी ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत. त्यांच्या अरेरावीच्या भाषेला त्याच पद्धतीने आम्हालाही उत्तर देता येते. या भागातील ग्रामस्थांच्या चांगुलपणाचा अंत पाहू नये, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने या गुंड प्रवृत्तीच्या माती वाहतूक करणाऱ्या चालकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा या भागात श्री. काळेश्‍वरी ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारतील असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर श्री. काळेश्‍वरी ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, व रेणावळेसह परिसरातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×