Pune : रेल्वे रुळांवर कचरा टाकल्याने धोका

पुणे : पुणे रेल्वे विभागातील काही रेल्वे रूळाजवळ वस्तीभाग असल्यामुळे येथील कचारा रूळाजवळच टाकला जातो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना जनजागृतीतून आवाहन केले जात आहे, मात्र कचरा कमी होत नाही. नागरिकांची एक चूक जीवावर बेतू शकते, त्यामुळे नागरिकांनी कचरा टाकू नये असे आवाहन यावेळी रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग हा मुंबई-पुणे-दक्षिणेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हा मार्ग पुणे शहरालगत परिसरातून जातो. मात्र, घोरपडी-सासवड-फुरसुंगी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ सय्यदनगर, काळेपडळ, रामटेकडी आणि घोरपडी चाळ परिसरात राहणारे नागरिक रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. रेल्वे रुळाशेजारी कचरा टाकल्याने काही वेळा आगीच्या घटना घडू शकतात. तसेच कचरा टाकल्याने भटके जनावरे खाण्यासाठी येत असतात. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धाेका निर्माण होऊ नये, यासाठी कचरा टाकू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.
तेल टँकर, कोळसा आणि इतर ज्वलनशील वस्तूंची वाहतूक रेल्वेद्वारे केली जाते. रुळांलगत कचरा जाळला जात असल्याने याची झळ मालगाडीला बसल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे रुळावर, मार्गावर कचरा टाकून नये, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाने केले आहे. यानंतरही कचरा टाकल्यास रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने केला आहे.
संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य कधी?
मध्य रेल्वेने स्थानकांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमले आहेत. मात्र, रुळांलगत गटारातील कचरादेखील बऱ्याचदा वर काढून ठेवला आहे. पावसाळ्यात हाच कचरा वाहून पुन्हा गटारात जातो. त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी तुंबते. हा कचरा रुळांलगत न टाकता तेथून उचलून त्याची दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.





