सासवड : पुरंदर तालुक्यात विशेषतः भिवरी- सासवड रोड परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्लरमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची गंभीर चिंता पालक व सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही हुक्का सहज उपलब्ध होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. भिवरी, सासवड रोड, शहरालगतच्या काही भागांमध्ये आकर्षक लाईटिंग, डीजे संगीत आणि कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उघड उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी होत असून परिसरात धूम्रपान, मद्यप्राशन आणि संशयास्पद हालचाली वाढल्याचे नागरिक सांगत आहेत. काही पार्लरमध्ये बाहेरून येणाऱ्या तरुणांची मोठी वर्दळ असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या हुक्का पार्लरच्या माध्यमातून अवैध व्यवसाय तेजीत सुरू असून काही ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत दुचाकींचा गोंधळ, संगीतरजनी, भांडणे आणि गोंगाट, दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची चर्चा होत आहेत. अनेक वेळा नागरिकांनी पोलिसांकडे लेखी व तोंडी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सासवड पोलीस स्टेशनच्या भूमिकेबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना वारंवार माहिती देऊनही अनेक हुक्का पार्लर राजरोस सुरू आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी “जर पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई केली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुक्का संस्कृती वाढली नसती,” अशी बोलकी आणि विचार करायला लावणारी प्रतिक्रिया दिली आहे. दहापट आरोग्याला घातक वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हुक्का हे सिगारेटपेक्षा कमी घातक असल्याचा गैरसमज तरुणांमध्ये आहे; मात्र प्रत्यक्षात हुक्कामधून शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक रसायने जातात. यामुळे फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार आणि मानसिक व्यसन वाढण्याचा धोका अधिक असतो. विशेषतः कॉलेज तरुणांमध्ये “स्टेटस” आणि “फॅशन” म्हणून हुक्का ओढण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. पालक वर्गातूनही तीव्र चिंता व्यक्त होत आहे. “मुलं अभ्यासाच्या नावाखाली बाहेर पडतात आणि रात्री उशिरापर्यंत हुक्का पार्लरमध्ये बसतात. त्यामुळे घरातील वातावरण बिघडत असून अनेक तरुण चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती आहे, असे एका पालकाने सांगितले. जबाबदार अधिकारी करतात काय? दरम्यान, काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून अवैध हुक्का पार्लरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नियमबाह्य सुरू असलेल्या पार्लरची चौकशी करून परवाने रद्द करावेत, अल्पवयीन मुलांना प्रवेश देणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या संशयित व्यवसायांवर धडक मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुरंदर तालुक्यात वाढणारी हुक्का संस्कृती ही केवळ आरोग्याची नव्हे तर सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेची गंभीर समस्या बनत चालली असून प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हेही वाचा : Pune District : वाल्हे बाजारात कोथिंबीर ६० रूपये जुडी भाव; आठवठ्याचे गणित कोलमडले : ग्राहकांना झळ