मुंबई : लोकसभा निवडणुकीत ज्या ट्रम्पेटमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्याच ट्रम्पेटने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांना जोरदार झटका दिला आहे. या ट्रम्पेटमुळे 9 मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. चला तर मग कोणकोणत्या मतदारसंघात झाला पराभव जाणून घेऊया… 1) घनसावंगी मतदारसंघ जालनाच्या घनसावंगी मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेष टोपें यांचा 2,309 मतांनी पराभव झाला. त्याच मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल 4,830 मते मिळाली. ज्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांचा विजय झाला. 2) बेलापूर मतदारसंघ बेलापूरमध्ये संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. याच मतदारसंघात ट्रम्पेटला 2,860 मते मिळाली. यामुळे भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या. 3) आंबेगाव मतदारसंघ आंबेगावमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा 1,523 मतांनी पराभव झाला. तिथे ट्रम्पेटला 2,965 मिळाल्यामुळं राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटलांचा विजय सोपा झाला. 4) पारनेर मतदारसंघ पारनेरमध्ये राणी लंके यांचा अवघ्या 1,526 मतांनी पराभव झाला. इथे ट्रम्पेटला एकूण 3,582 मते पडली. या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काशिनाथ दाते यांचा विजय झाला. 5) अणुशक्तीनगर मुंबईतल्या अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांचा 3,378 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी ट्रम्पेटला 4,075 मते पडली. आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक विजयी झाल्या. 6) शहापूर मतदारसंघ ठाण्याच्या शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा 1,672 मतांनी पराभूत झाले. याच मतदारसंघात ट्रम्पेट 3,892 मतांमुळे राष्ट्रवादीच्या दौलत दरोडांचा विजय सोपा झाला. 7) परांडा मतदारसंघ उस्मानाबादच्या परांड्यात राहुल मोटे यांचा 1,509 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी ट्रम्पेटनं 4,446 मतं खेचल्यानं शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा विजय झाला. 8) केज मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघात ट्रम्पेटनं 3,559 मते खेचल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठेंना 2,678 मतांनी पराभव स्विकारावा लागला. या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंडदा विजयी झाल्या आहेत. 9) जिंतूर मतदारसंघ परभणीच्या जिंतूरमध्ये विजय भांबळेंचा 4,516 मतांनी पराभव झाला. इथे ट्रम्पेटला 7,430 मते पडली त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डीकरांचा विजय सोयीस्कर झाला. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे साताऱ्याची जागा गमावल्यानंतर आणि अनेक मतदारसंघात मताधिक्य घटल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं हे चिन्ह हटवण्याची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाकडून ही मागणी अमान्य करण्यात आली आणि याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.