मुंबई – भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असूनही भारत अमेरिकेदरम्यानचा व्यापार करार खोळंबल्यामुळे रुपयावरील दबाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी रुपयाचा भाव 39 पैशांनी कमी होऊन 90.33 रुपये प्रति डॉलर या नव्या निचांकी पातळीवर गेला. या अगोदर अमेरिकेबरोबरचा व्यापार करार डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र एकूण परिस्थिती पाहता हा करार डिसेंबरमध्ये होईल की नाही याबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात आशावाद व्यक्त केला असला तरी अर्थ मंत्रालयाचे सल्लागार व्ही अनंत नागेश्वरांनी यांनी हा करार मार्च महिन्यापर्यंत होईल असे सांगितल्यानंतर डॉलरची मागणी वाढली आणि रुपयाच्या भावावर परिणाम झाला असल्याचे काही विश्लेषकांनी नमूद केले. भारताची व्यापारातील तूट जास्त वाढत आहे. मात्र भारताकडे परकीय चलनाचा बराच साठा आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये व्याजदर कपात झाल्यामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 96.81 अंकावर आला. या कारणामुळे रुपयाची जास्त घसरण झाली नाही असे काही विश्लेषकांनी सुचित केले. बुधवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत सात पैशांनी कमी झाला होता. जोपर्यंत भारत -अमेरिका व्यापार करार होणार नाही तोपर्यंत रुपयाच्या मूल्यावरील दबाव कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी भारताने अमेरिकेसमोर सुयोग्य प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही व्यापार करार होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे खनिज तेलाच्या किमती कमी होऊन सध्या 61 डॉलरवर आल्या आहेत. भारताला खनिज तेलाच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलरचा वापर करावा लागतो. खनिज तेलाच्या किमती कमी होऊनही रुपयावरील दबाव कायम असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री हा या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय असल्याचे समजले जाते. या गुंतवणूकदारांनी बुधवारी 1,651 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.