प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मुख्य मिरवणूक मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथे गणेश मंडळांनी रथावरील देखाव्याची उंची 18 फूट तर कर्वे रस्त्यावरील मंडळांनी किमान 16 फूट असावी, असे आवाहन डेक्कन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सर्व मंडळांना केले आहे. पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी विविध राज्यांसह देशातून भाविक पुण्यात येतात. दहा दिवसातील देखाव्यांसह विसर्जन मिरवणुकीसाठी भाविकांची अलोट गर्दी होते. दोन वर्षांनंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात होत असल्यामुळे भाविकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विसर्जन मिरवणूक म्हटल्यावर रथावर उभारलेले उंच देखावे भाविकांना आकर्षित करतात. मात्र, पुण्यातील मेट्रोच्या उड्डाणपुलामुळे या देखाव्याची उंची मंडळांना मर्यादित ठेवावी लागणार आहे. लकडी पूल आणि कर्वेरस्त्यावरील मेट्रोच्या पुलामुळे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीतील रथावर उभारलेल्या देखाव्याची उंची किती असावी, याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. अनंत चतुदर्शी दि. 9 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. पुण्यातील मुख्य मिरवणूक मार्गावरुन सर्व मंडळे विसर्जनासाठी अलका टॉकीज चौकातून छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) यावरून खंडुजीबाबा चौकातुन विसर्जन घाटांकडे मार्गस्थ होत असतात. परंतू, खंडुजीबाबा चौक येथे लकडी पुलावर नव्याने तयार झालेल्या मेट्रोच्या पुलाची उंची 21 फूट आहे. त्यामुळे लकडी पुलावरून येणाऱ्या गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथाची देखाव्यासह कमाल उंची 18 फूट ठेवावी. तसेच कर्वे रोडवरील गरवारे मेट्रो स्टेशन येथील रस्त्यापासून मेट्रो स्टेशनची उंची 18 फूट आहे. तसेच नळस्टॉप कर्वेरोड येथील मेट्रो ओव्हर ब्रीजची उंची 17 फूट असून कर्वेरोडवरील ओव्हर ब्रिज लगतचे दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची कमीत कमी रुंदी ही 15 फूट आहे. त्यामुळे कर्वेरोड मार्गे मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये समाविष्ठ होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या देखाव्याची उंची 16 फूट ठेवावी आणि तर रुंदी 12 फूट ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.