टी.व्ही.पाहण्याच्या वादातून मुलाच्या मृत्यूस कारणीभुत ; वडिलांना 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – टी.व्ही. पाहण्यावरून झालेल्या वादातून चाकुने गळ्यावर वार करून 21 वर्षीय मुलाच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या वडिलांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी हा आदेश दिला आहे.

नंदु उत्तम आवळे (वय 56, रा. शेवकर वस्ती, हडपसर) असे शिक्षा झालेल्या वडिलांचे नाव आहे. धाकटा मुलगा रोहित (वय 23) याचा खून केल्याप्रकरणी थोरला मुलगा राहुल (वय 32) याने वानवडी पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 29 मे 2015 रोजी रात्री 10.25 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी फिर्यादी म्हणजे मृत्यू झालेल्याचा थोरला भावाची साक्ष, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुराव्याला पृष्टी देणारा चाकु आणि कपड्यावरील रक्ताचा रासायनिक अहवाल महत्त्वाचा ठरला. पोलीस हवालदार एस.पी.पवार यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

रोहित हा आई-वडिलांसोबत घरात राहत होता. तर, राहुल जवळच दुसऱ्या घरात त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. घटनेच्या दिवशी राहुल घरी आला होता. दोघे भाऊ टी.व्ही. पाहत बसले होते. त्यावेळी नंदु याने बातम्या लावण्याची आणि टी.व्ही.च्या रिमोट देण्याची मागणी केली. त्यावेळी रोहित याने सिनेमा पाहत आहे, असे सांगितले. टी.व्ही.चा रिमोटही दिला नाही. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी “तुला मारूनच टाकतो’ असे म्हणत नंदु घरातुन चाकु घेऊन आला. रोहित याच्या गळ्यावर वार केला. त्यावेळी त्याच्या श्‍वसनलिकेला जखम झाली. तो जागीच कोसळला. त्यावेळी तेथे असलेल्या थोरल्या भावाने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तपासून त्याला मयत घोषित करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नंदु याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार (खून) गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने भादवी कलम 304 (मृत्यूस कारणीभुत) नुसार शिक्षा सुनावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.