चिखली – पिंपरी चिंचवड महापालिकेचा ड्रेनेजविभाग नक्की काम करतो की नागरिकांची गैरसोय अशी चर्चा सध्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभागांमध्ये सुरू आहे. मागील काही वर्षांपासून चिखली, कृष्णानगर, महात्मा फुलेनगर आदी परिसरातील ड्रेनेजलाइन तुंबण्याची समस्या नागरिकांची पाठ सोडताना दिसत नाही. महापालिका प्रशासनाने फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ड्रेनेजलाइनची पूर्णतः साफसफाई करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिखली रोड येथील महात्मा फुलेनगर परिसरात रहिवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील ड्रेनेज विभाग येथील समस्या कायमस्वरुपी सोडविताना दिसून येत नाही. चिखली-आकुर्डी मार्गावर मागील महिन्यात देखील ड्रेनेजलाइन तुंबल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत होते. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या परिसरात सोमवारी पुन्हा ड्रेनेजलाइन तुंबल्याने हौसिंग सोसायटीमध्ये मैलामिश्रित पाणी शिरले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ड्रेनेजलाइन तुंबल्याने सर्व मैला रस्त्यावरून वाहत आहे. हौसिंग सोसायटीच्या मुख्य गेटच्या आत आणि समोरील रस्त्यावरून दूषित पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवाशांना एक ते दीड महिन्यापासून घाणीच्या साम्राज्याचा सामना करत जीवन जगावे लागत आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चिखली परिसरात महात्मा फुलेनगर, साने चौकाजवळील भाजी मंडई भागात, महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेच्या प्रवेशद्वारा तसेच साने चौक ते शिवरकर चौकादरम्यान सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबत आहे. यावर महापालिका प्रशासन कायमस्वरुपी तोडगा काढत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेजलाइनमधील पाणी रस्त्यावरून, नागरिकांच्या घरांत शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.
महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे या भागातील नागरिकांचे धोक्यात आले आहे. परंतु महापालिका प्रशासन केवळ तात्पुरती उपाययोजना करून निघून जात आहे. पुन्हा काही दिवसांत तीच परिस्थिती निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिक वैतागले आहेत. तरी महापालिका प्रशासनाने येथील ड्रेनेजलाइनचा कायमचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
– स्थानिक नागरिक.