पुणे – भारत देश हा सांस्कृतिक विविधता असणारा देश आहे. विविध धार्मिक परंपरेत फुलांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक मंदिराबाहेर फुलाचे हार विकले जातात. जन्मापासून मरण्यापर्यंत होणाऱ्या सर्वच कार्यक्रमात फुले हमखास असतातच.करोनामुळे सर्वत्र मंदिर, चर्च, विहारे तसेच इतर सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. लग्न, वाढदिवस इतर कार्यक्रमांनाही बंदी आहे. या सर्वाचा परीणाम फुल उत्पादकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. दररोजच्या मार्केटमधील फुलाची मागणी लक्षात घेता, महाराष्ट्रातील एक मोठा शेतकरी वर्ग फुलशेती करतो. गुलाब, जरबेरा, झेंडू, निशिगंध, केवडा अशा फुलांना मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.परंतू करोनामुळे शेतकरी तसेच व्यापारी संकटात सापडले आहेत.सर्व सण-समारंभ रद्द करण्यात आले आहेत. फुलांच्या हाराची मागणी शून्यावर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहेत. शहरातील या व्यापाऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीचा थेट संबंध ग्रामीण भागात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. फुलबागेकरीता खर्च केलेले लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न फुल उत्पादकांसमोर उभा राहिलेला आहे. राज्यभरात फुलाच्या व्यवसायाशी संबंधित अनेक व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.