नवी दिल्ली – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला आज संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतावर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून भारतातर्फे संयुक्त राष्ट्र संघटनेकडे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान, आज मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात आल्याने भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईचे हे फळ असून भारताने मसूद अजहर ला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या निर्णयामुळे आता मसूद अझर आणि त्याच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला त्यांच्या कृत्यांची शिक्षा देता येणार आहे.”