चारा-पाण्याचे दुर्भिक्ष, मेंढपाळांचे कोकणात स्थलांतर

तालुक्‍यातील दुष्काळाची भीषणता वाढली

वाई  – वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पहावयास मिळते. कारण या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवरची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाऱ्याला याची मोठी झळ पोहोचते.


या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्‍न काही अंशी मिटला असलातरी चाऱ्याचा प्रश्‍न पुन्हा एैरणीवर येणार आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्याचाही विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ज्या तालुक्‍याकडे पहिले जात होते तो म्हणजे वाई तालुका. या तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची मुबलकता असणाऱ्या तालुक्‍यातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. वाई तालुक्‍याच्या पूर्व भागात दुष्काळामुळे दिवसेंदिवस भीषण होत चालले आहे. धरणातील पाणी संपले आहे. पूर्व भागात तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु, दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे. पण मेंढ्या पाळणाऱ्यांना त्या पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने या भटकणाऱ्या प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होत चालल्यानेच वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील व खंडाळा, लोणंद, फलटण व उत्तर कोरेगांव परिसरातील मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यासह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दररोज मेंढ्यांचे कळप पसरणी घाटातून कोकणाच्या दिशेनी जाताना दिसत आहेत. पाणी-चाऱ्यासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपाळांकडून समजले. ही आतिशय गंभीर बाब असून मुक्‍या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. वाई तालुक्‍यासह पूर्व भागतील तालुक्‍यांमध्ये असे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.