पुणे – महापालिका निवडणुका घेण्याला भाजप-शिवसेना आजही तयार आहे. महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुका लांबणीवर पडल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. प्रदेश कार्यसमिती बैठकीसाठी बावनकुळे गुरुवारी पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “नवीन जनगणना होत नाही, तोपर्यंत सदस्य संख्या आणि प्रभाग रचना वाढवता येत नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारने नियमबाह्य काम करत लोकसंख्या वाढवून प्रभाग रचना तयार केली. त्यांच्या नेत्यांनीही ते मान्य केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केला. त्यामुळेच राष्ट्रवादी न्यायालयात गेली. नेते मंडळी सोडून जातील, या भीतीनेच मुंबईत भाजपचे कोणी नेते आले की राऊत टीका करतात. निवडणुका होतील, तेव्हा संजय राऊत यांना जे. पी. नड्डा यांचा प्रवास किती महत्वाचा होता, हे कळेलच’, असे संजय राऊत यांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले. तर, सिलिंडर, पेट्रोल ही दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडीत आहे. तर, पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नाही, त्यामुळे आता यावर बोलण्यात काही अर्थ नाही, असे सांगत त्यांनी भाष्य टाळले. डॉ. कुरुलकरप्रकरणी भाष्य… “डॉ. कुरुलकर यांची चौकशी यंत्रणांतर्फे केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जी व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर तो गुन्हेगार आहेत. त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. कोणत्या तो धर्माचा आहे किवा जातीचा आहे, हे बघून भाजप टीका करत नाही,’ असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.