भिगवण (वार्ताहर) – शेटफळगडे (ता. इंदापूर) येथील जि. प. शाळेची अपुर्या भौतिक सुविधांमुळे दयनीय अवस्था झाली असून त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तेथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता सवाने यांनी प्रशासनाला दिला आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा नावलौकिक टिकवून आहेत. या शाळा ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्कृतीचा पाया मानली जाते. अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची जडणघडण या जिल्हा परिषद शाळेतून झाली आहे. शेटफळगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अपुर्या भौतिक सुविधा मिळत असल्याने विद्यार्थी, पालक यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे. गेली अनेक वर्षापासून जि. प. शाळेच्या शौचालयाची इमारत नादुरुस्त आहे. अनेक वेळा शिक्षक तसेच पालक यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शौचालयाचा प्रश्न सुटला नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण सुविधा असणे अपेक्षित आहे; परंतु या ठिकाणी क्रीडांगणाचाही अभाव असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नसल्याने पालक वर्ग आता अॅक्शन मोडवर आहे. विद्यार्थ्यांना या सुविधा पुरवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता सवाणे यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर तात्काळ कारवाई करून 15 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.