Holi 2025 – मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात होळीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातील एक विचित्र घटना उघड झाली आहे. येथील एका नामांकित पदवी महाविद्यालयात होळी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी न मिळाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. त्यानंतर विद्यार्थी नेत्यांनी या संस्थेच्या हॉलचे दार बंद केले आणि प्राध्यापकांनाच ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी शहरातील सरकारी होळकर विज्ञान महाविद्यालयात ही घटना घडली. विद्यार्थी नेत्यांना होळी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांनी हॉलमध्ये प्राध्यापकांना कोंडून दरवाजा बंद केला. विद्यार्थी नेत्यांच्या गोंधळ आणि घोषणाबाजीत महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक सुमारे अर्धा तास हॉलमध्ये बंद होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नंतर एक कर्मचारी कसा तरी खिडकीतून बाहेर आला आणि त्याने दरवाजा उघडला व अन्य प्राध्यपकांना हॉलमधून बाहेर पडता आले. इंदूरचे जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह यांनी ही घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले असून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनामिका जैन यांच्या तक्रारीवरून, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (एडीएम) यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले, एडीएमच्या चौकशी अहवालाच्या आधारे या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल. कॉलेजची स्थापना केव्हा झाली होती…. ‘होळकर सायन्स कॉलेज’ची स्थापना १३३ वर्षांपूर्वी इंदूरच्या तत्कालीन होळकर शासकांनी केली होती. ७ मार्च रोजी या महाविद्यालयात होळकरांचा होळी उत्सव नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लाइव्ह डीजे आणि रेन डान्सचीही व्यवस्था असणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका कोचिंग क्लासने प्रायोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रति व्यक्ती १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते.