पिंपरी – करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव टाळावा. जर सोसायट्यांना गणेशमूर्ती बसवायचीच असेल तर त्यांनी पाचपेक्षा कमी व्यक्तींमध्येच गणरायाची आरती करावी. रहिवाशांनी शक्यतो घरगुती स्वरुपात शाडू मातीची गणेशमूर्ती बसवावी. तसेच, घरातच त्याचे विसर्जन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनच्या वतीने केले आहे.
करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सोसायट्यांमध्ये सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव करू नये. त्याऐवजी सोसायटीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी गणपती बसविण्यात यावा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत वेबीनारद्वारे झालेल्या ऑनलाइन चर्चेत त्यांनी गणेशोत्सवासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सवासाठी नागरिकांना परवानगीची गरज नाही, असेही त्यांनी संबंधित चर्चेत स्पष्ट केले होते. त्यामुळे ज्या सोसायट्यांना सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव करायचाच असेल त्यांनी तो 5 व्यक्तींच्या आतच करावा. त्यामुळे करोना संसर्ग रोखता येईल, असे फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी डोमसे-सवाई यांनी स्पष्ट केले आहे.