पुणे जिल्हा | संततधार पावसाने वाघोलीतील रस्त्यांवर पाणीच पाणी

वाघोली, (प्रतिनिधी)- मागीन दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने वाघोलीकरांची दैना उडविली. भर पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ आली. पुणे-नगर रोड तसेच सर्वच रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी ओढ्यासारखे वाहत असल्याने वाहतूक कोंडी झाली.
सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचे फ्लो वाहून अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. पावसाचे साचलेले पाणी वाघोलीतील अनेक सखोल भागात पाणी साचल्याने सोसायट्यांमध्ये शिरले आहे. पाणी साचलेल्या भागामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मांजरी खुर्द येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. मुळा मुठा नदीला महापूर आल्याने याठिकाणी स्मशानभूमीत पाणी शिरले आहे.
जुन्या पुलाशेजारीच नव्याने पूल उभारण्यात आला असला तरी या पुलाला पाणी धडकू लागल्याने येथील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस व प्रशासनाने पूर्णपणे बंद केली आहे. त्याचप्रमाणे तुळापुर-मरकळ गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल देखील पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद केली होती. नद्यांचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि, दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करुन घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी.
आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे. ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल, असे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागांतर्गत करण्यात आले आहे.
वाघोली मंडल विभागात ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस
पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने वाघोली मंडल विभागात दोन दिवसामध्ये ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जीवित झाल्याची घटना समोर आली नसली तरी नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. आवश्यक असल्यासच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





