दूधगंगा डावा कालव्यामुळे पंचक्रोशीत समृद्धी नांदणार – सतेज पाटील

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची परंपरा 50 वर्षांहून अधिकची आहे. लोकराजा शाहू महाराजाच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यात धरणे उभारण्यात आली आणि सिंचन क्षेत्र वाढले आहे. पाण्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतात, शेतकरी समृध्द होताना पाहणे हा गौरव आहे. तसेच दूधगंगा डावा कालव्यामुळे दिंडनेर्ली, नागाव, नंदगाव, दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत समृद्धी नांदणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
दूधगंगा डावा कालवा पाणी प्रथमत: प्रवाहित होणाऱ्या पाण्याचे जलपूजनाचा कार्यक्रम नंदगाव कॅनोल रोड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, या पंचक्रोशीतील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. या गावातील लोकांचे, सहकार्याचे व शेतकऱ्यांचे कौतुक करताना गंगा गावात आल्याने पाण्याचे नियोजन सुयोग्यरित्या करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सामुदायिक पध्दतीने उत्पन्न खर्च कमी करून उत्पन्न वाढले पाहिजे. नव्या युवा पिढीने एकत्र येवून एकत्रित शेती करून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच बाजार वाढीस वाव दिला पाहिजे. जिल्ह्यात यावर्षी ड्रोन पध्दतीने शेतीचा प्रयोग करण्यास चालना देताना प्रायोगिक तत्वावर प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, या चारही गावातील पाण्याचा प्रश्न सोडविताना विशेष आनंद होतो आहे. सोबतचे शेतीसाठीही पाणी मिळाल्याने 4 हजार पेक्षा अधिक सिंचन क्षेत्रास याचा लाभ होऊन या भागातील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूधगंगा कालवा कामाची सद्यस्थिती
दूधगंगा डावा कालवा 76 कि.मी. लांबीचा आहे. या प्रकल्पाद्वारे डाव्या कालव्यावरून राधानगरीतील 22 गावे, करवीर तालुक्यातील 11 गावे, कागल तालुक्यातील 8 गावे, हातकणंगले-2 गावे असे एकूण 43 गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. 1 ते 31 कि.मी. (माजगांवपर्यंत) कामे सन 2000 अखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित 32 ते 65कि.मी. पर्यंतची काम पूर्ण असून पाणी सोडणेकरिता कालवा तयार आहे. उर्वरित 66 ते 76 कि.मी. माहे जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे जवळपास 7 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.





