डीएसके घोटाळा : ‘डीएसकेडीएल’च्या अडीच कोटी शेअर्सचे मूल्य शून्य

पुणे – लाखो गुंतवणूकदार, ठेवीदारांनी उभी केलेली डीएसके समुहातील डीएसकेडीएल कंपनीचे अस्तित्व संपले आहे. “घराला घरपण देणारी माणसं’ अशी टॅगलाइन वापरून सामान्यांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या “डीएसकेडीएल’ कंपनीचे सर्व समभाग आता मातीमोल झाले आहेत.
कंपनी अवसायनात गेल्यानंतर जुलैमध्ये मुंबईतील अंशदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ताबा घेतला. त्यावेळी झालेल्या करारानुसारच कंपनीतील सहभाग नष्ट करण्याचे ठरले होते. त्यानंतर डीएसके यांच्या सर्वच कंपन्या अडचणीत आहेत. डीएसकेसह कुटुंबातील अनेक सदस्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने डीएसकेडीएल कंपनीवर अवसायक म्हणून मनोज कुमार अग्रवाल यांची नियुक्ती केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 25 कोटी 80 लाख 10 हजार 90 रुपयांचे प्रत्येकी दहा रुपयांचे 2 लाख 58 हजार 8 समभाग हे शून्य किमतीचे झालेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपनीतील सर्वाधिक म्हणजे 32 टक्के शेअर्स हे दुबई येथील एका व्यक्तीकडे होते. तर, काही शेअर्स डीएसके कुटुंबीयांकडे होते. उर्वरित शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे होते. या निर्णयाने सर्वांचे नुकसान होणार आहे.





