पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील अंतिम फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट गेली दोन वर्ष न्यायालयात दाखल करण्यात आलेला नाही, हा रिपोर्ट न्यायालयात दाखल करण्यात यावा, अशी मागणी डीएसके यांच्या वकिलांनी केली आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
डीएसके यांचे वकील ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी शुक्रवारी न्यायालयात ही मागणी केली आहे. डीएसके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट हा महत्तवाचा असल्याचे पोलिसांकडून आणि सरकारी वकिलांकडून सांगण्यात येते आहे. मात्र, गेली दोन वर्षे वारंवार मागणी करूनही हा रिपोर्ट अद्याप पर्यंत न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेला नाही.
डीएसके यांनी गुंतवणूकदारांची कशी फसवणूक केली, याची माहिती या रिपोर्टमध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र, अजूनही न्यायालयासमोर हा रिपोर्ट दाखल करण्यात आलेला नाही.
हा रिपोर्ट न्यायालयासमोर दाखल करण्यात आला नाही, तर या प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांविरुद्ध चुकीची माहिती दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, असा युक्तिवाद ऍड. राजोपाध्ये, ऍड. पाटणकर यांनी केला.
न्यायलयाने याची दखल घेऊन पुढील सुनावणीच्या वेळी फॉरेन्सिक रिपोर्ट दाखल करण्यात यावा, असे तोंडी निर्देश दिले असल्याची माहिती ऍड. राजोपाध्ये यांनी दिली.