Dry Day Violation – महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर ड्राय डे जाहीर असताना साताऱ्यात मात्र या आदेशाची सर्रास पायमल्ली झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहरातील काही वाइन शॉपमधून उघडपणे दारु विक्री सुरु असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राधिका रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात एका बोळात तर अक्षरशः ‘ड्राय डे’च्या फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. मुख्य दुकान बंद असल्याचा दिखावा केला जात असताना बाजूच्या अरुंद गल्लीतून ग्राहकांना मागच्या दाराने दारू पुरवली जात होती. काही ठिकाणी तर ठराविक ‘रेट’ लावूनच विक्री सुरू होती. त्यामुळे नियम केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच या भागात संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या. ग्राहकांची वर्दळ वाढत असतानाही पोलीस किंवा संबंधित विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ‘सामान्य नागरिकांना नियम पाळायला लावणारे प्रशासन स्वतःच अशा प्रकारांकडे डोळेझाक का करते?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. ड्राय डे दिवशी दारू विक्रीवर संपूर्ण बंदी असते. तरीही काही व्यावसायिकांकडून नफ्याच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या प्रकारामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे अशा विक्रीसाठी काही ठिकाणी ‘हप्ता’ पद्धतीने संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित वाईन शॉप्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा अशा बेकायदेशीर प्रकारांना आणखी खतपाणी मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र दिनासारख्या महत्वाच्या दिवशीच नियमांची अशी पायमल्ली होत असेल, तर इतर दिवशी परिस्थिती किती बिकट असेल याचा अंदाज यावरून येतो. प्रशासनाने आता तरी जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ‘ड्राय डे’ हा केवळ नावापुरताच उरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया साताऱ्यातून उमटत आहे.