nagar | ड्राय डे लाच येतो ओल्या पार्ट्यांचा ओघळ

नगर, {रवींद्र कदम} – जिल्ह्यात सध्या पारंपरिक सण-उत्सवांबरोबरच लोकशाहीचा मोठा राष्ट्रीय उत्सव सुरू झाला आहे. त्यातच विविध महापुरूषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी ड्राय डेचा फतवा काढला आहे.
मात्र, चक्क ‘ड्राय डे’च्या दिवशीच जिल्ह्यात दारूच्या रंगीत-संगीत ओल्या पार्ट्या होत असल्याने हा फतवा आता कुचकामी ठरू लागला आहे. ‘ड्राय डे’ असूनही याच दिवशी दारूविक्रीत मोठे उधाण येत असून ओल्या पार्ट्यांचा ओघळ शहरासह ग्रामीण भागातही जात असल्याने पोलीस यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमके करते तरी काय? असा सवाल नागरिकांनी जिल्हाधिकार्यांच विचारला आहे.
ड्राय डेच्या आदेशानंतरही शहरासह ग्रामीण भागातही आगे शटर डाऊन, पिछे दारू खुली, अशी खुलेआम दारूविक्री होत आहे. राज्य उत्त्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणेबरोबर अर्थपूर्ण संबंधातून ड्राय डेही चक्क आता दारूच्या ओल्या पार्ट्या करून साजरा होत असल्याने जिल्हाधिकार्यांचा ड्राय डेचा आदेश आता केवळ काला अक्षर भैस बराबर असा ठरला आहे.
‘ड्राय डे’ च्या दिवशी नगर शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार पोलीस ठाणे हद्दीत मद्यविक्री सर्रास सुरु होती. त्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या आदेशाला जिल्ह्यातच हॉटेल व्यावसायिकांनी केराची टोपलीच दाखविली आहे. त्यामुळे आदेशाची सिद्धता होत नसल्याने त्यांच्या आदेशात आता राम राहिला नाही, असे म्हणण्याची वेळ नगरकरांवर आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतचे वाभाडे निघालेच आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खाकी वर्दीची निष्क्रियता चव्हाट्यावर आलेली आहे. त्यातच जिल्हा प्रशासनही साखरझोपेत असल्याने जिल्ह्यातील ही यंत्रणा आता कुचकामी ठरू लागल्याची सल नागरिकांच्या मनात टोचू लागली आहे.
खून, दरोडा, चोर्या, घरफोडी अशा घटना वाढत आहेत. दोन दिवसापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला निलक्रांती चौकात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली. यात अनेक जखमी झाले असून अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, दारूविक्री बंद करण्याचे आदेश देऊनही अशा घटना दारू पिल्यानेच घडत आहेत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. तर विवाह सोहळ्यांचेही बार उडत असून गावोगावच्या यात्राही सुरू आहेत. अशा ठिकाणी चक्क ड्राय डेच्या दिवशीच दामदुपटीने मागील दारातून दारू सहज मिळत असल्याने तळीरामांनी जिल्हाधिकार्यांच्या ड्राय डेची खिल्ली उडविली आहे.
मात्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी काढलेल्या आदेशाची ड्राय डेच्या दिवशी सर्रास पायमल्ली होत आहे. जर कारवाई होत नसेल तर जिल्हाधिकार्यांनी ड्राय डेची नौटंकी बंद करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. परस्पर विरोधी उमेद्वारांकडून मतदारांना खूष करण्यासाठी ओलीपार्टी देण्यात येईल. यात अनेक बनावट दारूचे अड्डे सक्रीय होतील. अशा अड्ड्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करून ते रोखावे. गेल्या काही दिवसापूर्वी पांगरमल घटनेत बनावट दारूपायी ९ ते १० जणांचा बळी गेला. त्यामुळे प्रशासनाने अशा बनावट दारू तयार करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ड्राय डेच्या दिवशी दारूविक्रीचा विक्रम
ड्राय डेच्या दिवशी दारूविक्री बंद, असा जिल्हाधिकार्यांचा आदेश असतो. म्हणजे, या दिवशी दारूविक्री शून्यावर आलेली असते. मात्र, अशा ड्राय डेच्या दिवशीच जिल्ह्यात अनेक ठिकाणी विक्रमी दारूविक्री झाल्याची संख्यात्मक आकडेवारी आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे ड्राय डेचा आदेश जिल्हाधिकार्यांनी बासनात गुंडाळून ठेवावा, असा सल्ला नागरिकांनी दिला आहे.
बेकायदा हॉटेलवर मेहेरबानीची खैरात
नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक हॉटेलांची मालकी चक्क काही प्रस्थापित नेत्यांकडेच आहे. काही कार्यकर्तेही नेत्यांच्या मेहेरबानीमुळे हॉटेलमालक बनले आहेत. ही हॉटेल्स रात्रभर बेकायदेशीररित्या खुलेआम सुरू ठेवून अन्य दिवसांसह ड्राय डेच्या दिवशीही दारूविक्री करतात. याकडे पोलीस यंत्रणेतील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत असे हॉटेल खुलेआम सुरू आहेत. याकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्यावर मेहेरबानीची खैरात कोण करते? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

